

पाली ः शरद निकुंभ
अष्टविनायक श्री बल्लाळेश्वराचे पवित्र क्षेत्र असलेल्या पालीत दररोज मुंबई, पुणे, ठाणे, कोकण या भागांतून हजारो भाविक येत असतात. मात्र, पाली एसटी स्थानकाची दयनीय अवस्था पाहून आता अनेक भाविक खासगी वाहनांकडे वळले आहेत. परिणामी एसटी महामंडळाला महसुली तोटा सहन करावा लागत आहे.
पाली एसटी स्थानकाची इमारत पडून कित्येक वर्षे उलटली तरी अद्याप नवी इमारत उभी राहिलेली नाही. स्थानकाची अवस्था उघड्यावर चालणाऱ्या तात्पुरत्या शेडसारखी झाली आहे. उन्हात, पावसात प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.स्थानकात प्रवाशांसाठी बसायला फक्त दोन ते तीन बाके आहेत. बाकी प्रवाशांना झाडाखाली उभे राहून बसची वाट पाहावी लागते. उन्हाळ्यात झळाळत्या उन्हात आणि पावसाळ्यात ओल्या जमिनीवर थांबावे लागते. प्रवाशांच्या सेवेसाठी हे महामंडळाचे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात कोठेच दिसत नाही, अशी टीका नागरिकांतून होत आहे.
तिकीट आरक्षणासाठीची मशीन बिघडल्याने खिडकी गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. प्रवाशांना ऑनलाइन बुकिंगचा पर्याय वापरावा लागत आहे, मात्र तांत्रिक अडचणीमुळे अनेक जण खाजगी ठिकाणांहून आरक्षण करतात व त्यांना जादा पैसे द्यावे लागत असल्याने प्रवाशांच्या खिशाला कात्री बसत आहे. प्रवाशांसाठी आसनव्यवस्था नाही, मग प्रवाशांच्या सेवेसाठी असलेले महामंडळ नेमके काय सेवा करत आहे? असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
अधिकारी व लोकप्रतिनिधी मौनधारी
पाली एसटी स्थानकाचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असतानाही ना अधिकारी हालचाल करत आहेत ना लोकप्रतिनिधी आवाज उठवत आहेत. भाविक आणि प्रवाशांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असताना, लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेऊन नवीन बस स्थानक होण्यास काय अडचणी आहेत त्या समजून घेऊन त्यातून मार्ग काढावा अशी मागणी जोर धरत आहे.
पाली एसटी स्थानकाची नवी इमारत तातडीने उभारावी. आरक्षण खिडकी सुरू करावी. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयींचा आम्ही जाब विचारू. अन्यथा शिवसेना उबाठा आंदोलन छेडणार आहे.
विद्धेश आचार्य, शहराध्यक्ष, शिवसेना उबाठा, पाली