

अलिबाग : एकमेकांवर संशय....कुटुंबांतील वाद-विवाद.... व्यसन.... पैशांची मागणी.... पाश्चिमात्त्य संस्कृतीचा वाढता प्रभाव..., शारीरिक व मानसिक त्रास.... यासह इतर कारणांमुळे विवाहित जोडप्यांमध्ये कौटुंबिक कलह निर्माण होत असून, एकमेकांपासून विभक्त होण्यापर्यंत पती-पत्नीमधील संबंध ताणले जात आहेत. मात्र या कोमेजलेल्या या पती-पत्नीच्या नाते संबंधांमध्ये रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या लोक अदालतीने पुन्हा प्रेमाचा अंकुर फुलविला असून, मागील वर्षभरात घटस्फोट घेण्यापर्यंत पोहचलेल्या २५ जोडप्यांच्या रेशीमगाठी पुन्हा जुळविण्यात यश मिळविले आहे.
रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत तुटणाऱ्या संसाराची घडी बसवित त्यांना नांदा सौख्य भरे हा कानमंत्र दिला. पती पत्नी संसाराची दोन चाके असून यातील एक चाक जरी अविश्वास, संशयाच्या किंवा वादविवादाच्या गाळात रूतले तर संसाराचा गाडा मध्येच थांबतो. थेट घटस्फोट घेण्यापर्यंत प्रकरण पोहोचते.
अनेकांना न्यायालयाची पायरी चढावी लागते. तेथील फेऱ्या मारण्यातच काळ सरतो. नवरा बायको सोबतच त्यांच्या मुलांसह दोन्हीकडील कुटुंबाचीही वाताहत होते. शिवाय या कुटुंबामध्ये निर्माण झालेले वैर आयुष्यभर राहते. काही वेळेस छोट्या-छोट्या कारणामधून निर्माण झालेले गैरसमज केवळ सुसंवादाच्या अभावाने वाढत जातात व रेशीमगाठीचे बंध गळून पडतात.
घटस्फोटासाठी न्यायालयाची पायरी चढलेल्या पती-पत्नी यांमधील प्रकरणे तडजोडीसाठी लोक न्यायालयात ठेवण्यात येतात. मागील वर्षभरात पार पडलेल्या ४ लोक अदालतींमध्ये अशी ३ हजार १०२ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली. यामधील २५ पती-पत्नी जोडप्यांच्या नात्यात आलेला दुरावा तडजोडीअंती दूर करुन, त्यांच्यातील रेशीमगाठी पुन्हा जुळविण्यात यश मिळविले असल्याची माहिती रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने दिली आहे