

खोपोली: पप्पा मला नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत सोडायला आले आणि नंतर घ्यायला येतो बोलले, परंतु परत आलेच नाहीत. माझ्या माझ्या पप्पाचं गुन्हा काय होती त्यांची हत्या केली. शेवटचं माझ्या पप्पाचं तोंडही पाहू शकलो नाही. हा हृदय भेदून टाकणारा आक्रोश वैष्णवी आणि आर्याचा पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. आरोपींना फाशी शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी दोन्ही मुर्लीसह आणि पुतण्या राज यांनी केली आहे.
खोपोली नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळेखे हे मुलींना शाळेत सोडण्यासाठी गेले होते शाळेतून परतत असतानाच विहारी पुलाजवळ रस्त्यावर मारेकऱ्यांनी त्यांची गाडी अडवून थेट हल्ला चढवला आणि वार करून काळोखे यांना संपवलं होतं या घटनेने रायगड जिल्हा हादरून गेला होता.
अजूनही काळोखे परिवार या मोठ्या धक्क्यातून सावरलेला नाही. तरीही दोन्ही मुलींनी मोठ्या धैर्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या दुःखाला वाचा फोडली. पप्पा आमचे पालनपोषणकर्ते होते, हे आरोपी पुन्हा सुटले तर गावात पुन्हा दहशत माजवतील म्हणून आरोपींना फाशी किंवा मोक्का अंतर्गत कारवाई झाली पाहिजे अशी मागणी छोटी मुलगी आर्या हिने केली आहे.
निवडणुकीपूर्वीही धमकी
निवडणुकीच्या अगोदर दोन्हीही मुलींना ठार मारू तसेच निवडणुकी नंतर तुला दाखवतो अशी धमकी माझ्या पप्पाला दिली होती, त्यांना अजून अटक झाली नसल्याची खंत मोठी मुलगी वैष्णवी हिने व्यक्त करीत आरोपींना फाशी शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी माध्यमांशी बोलताना केली आहे. पोलिसांनीही २४ तासात आरोपींना अटक केली आहे. आरोपींना ४ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.