

अलिबाग: जिल्ह्यात गणेशोत्सवामुळे नागरिकांचा कल शाकाहारी जेवणाकडे आहे. गणेशोत्सवातील धार्मिक परंपरा आणि उपवासाच्या पार्श्वभूमीवर घरगुती जेवणात विविध स्थानिक भाज्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.
त्यामुळे रानभाज्या, स्थानिक भाजीपाला आणि फळभाज्यांना बाजारपेठेत चांगली मागणी निर्माण झाली आहे. या वाढत्या मागणीचा थेट फायदा ग्रामीण भागातील शेतकरी तसेच महिला विक्रेत्यांना होत आहे.
रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून सध्या मोठ्या प्रमाणात स्थानिक भाजीपाला शहरातील आणि तालुक्याच्या मुख्य बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी आणला जात आहे. यामध्ये भोपळा, दुधी भोपळा, शिराळी, कारली, चवळी, करटोली, काकडी यांसह विविध हंगामी भाज्यांचा समावेश आहे. पावसाळ्यानंतर उपलब्ध होणाऱ्या या स्थानिक भाज्या ताज्या आणि चविष्ट असल्याने ग्राहकांकडून त्यांना विशेष पसंती मिळत आहे.
रायगडच्या ग्रामीण भागात अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतीने विविध भाज्यांची लागवड करतात. रासायनिक घटकांचा कमी वापर करून किंवा नैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या भाज्यांना ग्राहकांकडून मागणी वाढत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. स्थानिक पातळीवर उपलब्ध होणाऱ्या भाज्या ताज्या असल्याने त्यांच्या पौष्टिकतेबाबतही ग्राहकांमध्ये विशेष जागरुकता दिसून येते.
गणेशोत्सवाच्या काळात शाकाहारी पदार्थांना मागणी वाढल्याने बाजारपेठांमध्ये ग्रामीण महिलांचीही मोठी वर्दळ दिसून येत आहे. सकाळच्या वेळेत महिला आपल्या शेतातील किंवा गाव परिसरातील भाजीपाला घेऊन शहरातील बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी येत आहेत.
त्यामुळे त्यांना उत्सवाच्या काळात काही दिवसांचा चांगला रोजगार उपलब्ध होत आहे. थेट ग्राहकांना भाजी विकल्यामुळे या महिलांना त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळत आहे.
पौष्टिक आणि सकस अन्न
गणेशोत्सवाच्या निमित्ताने स्थानिक भाजीपाल्याची मागणी वाढणे हे केवळ ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठीच नव्हे, तर स्थानिक अन्नसंस्कृतीच्या दृष्टीनेही महत्त्वाचे मानले जात आहे. पारंपरिक भाज्यांचा आहारात समावेश होत असल्याने नागरिकांना सकस आणि ताजा भाजीपाला उपलब्ध होत आहे.
त्यामुळे एका बाजूला ग्रामीण महिलांना रोजगाराची संधी मिळत असताना दुसऱ्या बाजूला नागरिकांना आरोग्यदायी अन्न मिळत आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने स्थानिक शेतमालाला असणारी मागणी रायगडच्या निसर्ग, शेती आणि संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.