

महेश पांचाळ
मुंबई: ३ सप्टेंबरच्या मध्यरात्री पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भरे येथील श्री विद्या भवन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये तीन चोरट्यांनी रोख रक्कम आणि प्राचार्यांच्या कक्षातील सोन्या-चांदीच्या वस्तू असा सुमारे ११ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले तिघेही चड्डी-बनियान परिधान केलेले दिसून आले. याचदरम्यान समृद्धी महामार्गावर वाहनांना लक्ष्य करून लूट केल्याचा प्रकार समोर आला.
२७ ऑगस्ट रोजी सिन्नरजवळील माळढोण-दुशिंगपूर परिसरात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचे टायर रस्त्यावर धारदार लोखंडी वस्तू टाकून पंक्चर करण्यात आले. वाहन थांबताच प्रवाशांना लक्ष्य करून लूट करण्यात आली. या प्रकरणात सुमारे १८ लाख रुपयांचा मुद्देमाल लुटला.
अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आधी लक्ष्याची रेकी केली जाते. घरफोडीसाठी निर्जन भागातील घरे, तर महामार्गावरील लुटीसाठी रात्रीच्या वेळी वर्दळ कमी असलेले रस्ते हेरले जातात.
महामार्गावर वाहनांचे टायर पंक्चर करण्यासाठी नखे, लोखंडी तुकडे किंवा धारदार वस्तूंचा वापर केला जातो. वाहन थांबल्यानंतर चालक किंवा प्रवासी खाली उतरताच त्यांना दगडफेक, मारहाण किंवा शस्त्रांचा धाक दाखवून लुटले जाते. घरफोडीच्या घटनांमध्येही रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत प्रवेश करून मौल्यवान वस्तू लंपास केल्या जातात.
मुंबईतील ठळक घटना
मुंबईत अशा टोळ्यांविरोधात यापूर्वी पोलिसांनी कारवाया केल्या आहेत. २०१६ मध्ये बोरीवलीत वृद्ध दाम्पत्याच्या घरावर दरोडा टाकणाऱ्या टोळीतील चार संशयितांना पोलिसांनी अटक केली होती. संशयितांकडून शस्त्रे आणि लुटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
२०२३ मध्ये मुंबई पोलिसांनी चिंटू चौधरीला घरफोडीप्रकरणी अटक केली. त्याच्याकडून सुमारे १२ लाख रुपयांचे सोने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. त्याच्या अटकेमुळे भांडुप, टिळकनगर, बोरीवली आणि ठाणे परिसरातील सहा घरफोड्यांची उकल झाल्याचे पोलिसांनी सांगितले होते.
२०२४ मध्ये मीरा-भाईंदर, वसई-विरार गुन्हे शाखेने बाबुराव अण्णा काळे याला २१ वर्षांनंतर अटक केली. २००३ मधील विरार येथील घरफोडी-दरोड्याच्या प्रकरणात तो फरार होता. राज्यातील विविध ठिकाणी त्याच्याविरुद्ध दहापेक्षा अधिक गुन्हे असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.
प्रवाशांनी काय काळजी घ्यावी?
रात्री महामार्गावर टायर पंक्चर झाल्यास निर्जन ठिकाणी तातडीने खाली उतरू नये.
शक्य असल्यास वाहन सावकाश प्रकाश असलेल्या सुरक्षित ठिकाणी न्यावे.
वाहनाचे दरवाजे लॉक ठेवून पोलिसांची मदत घ्यावी.
आजूबाजूला संशयास्पद हालचाल दिसल्यास स्वतःहून सामोरे जाण्याऐवजी सुरक्षित अंतर ठेवावे.
नागरिकांनी सावध राहावे
मुळशीतील शाळेतील चोरी, समृद्धी महामार्गावरील वाहनांना लक्ष्य करून लूट आणि डोंबिवलीतील घरफोड्या या घटनांचे आरोपी किंवा टोळी एकच असल्याचे सध्या निष्पन्न झालेले नाही. मात्र, रात्रीचा अंधार, निर्जन परिसर आणि निष्काळजीपणाचा फायदा घेऊन चोरी-लूट करणाऱ्या गुन्हेगारांपासून नागरिकांनी सावध राहण्याची गरज या घटनांतून अधोरेखित होते.