

HIV Infection Rate Decline Raigad
पनवेल : महाराष्ट्र राज्य एड्स प्रतिबंधक संस्था आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यात एड्स प्रतिबंध व नियंत्रणासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांना सकारात्मक परिणाम मिळत आहेत. जनजागृती, तपासणी, समुपदेशन आणि उपचाराच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे तपासण्यांचे प्रमाण वाढले असून, संसर्गाचे प्रमाण ०.१७ टक्क्यांवर आले आहे. विशेष म्हणजे उपचार घेत असलेल्या सुमारे ९७ टक्के रुग्णांमध्ये विषाणू नियंत्रणात असल्याचे आढळले आहे.
जिल्ह्यात सर्वसाधारण नागरिकांच्या १७ हजार ४३२ तपासण्यांचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात ४३ हजार ५१९ जणांची तपासणी करण्यात आली. तसेच ११ हजार ७५६ गरोदर मातांच्या तपासणीचे उद्दिष्ट असताना १८ हजार ३१४ तपासण्या झाल्या. एकूण ६१ हजार ८३३ तपासण्यांमध्ये १०३ जण बाधित आढळले. २०१४-१५ मध्ये ०.४२ टक्के असलेले संसर्गाचे प्रमाण आता ०.१७ टक्क्यांवर आले आहे.
जिल्ह्यात २००२ पासून आतापर्यंत ११ हजार २४२ जणांमध्ये संसर्ग आढळला आहे. उपचारपूर्व नोंदणीचे प्रमाण २००९ मधील २४ टक्क्यांवरून २०२६ मध्ये ७८.४२ टक्क्यांवर पोहोचले आहे. अलिबाग जिल्हा रुग्णालय, लोधिवली येथील धीरूभाई अंबानी रुग्णालय आणि कामोठे येथील एमजीएम रुग्णालय या तीन केंद्रांत उपचार सुरू आहेत. या केंद्रांवर ४ हजार ६४२ रुग्ण नियमित औषधोपचार घेत आहेत.
एप्रिल ते जुलैदरम्यान १ हजार ६७३ रुग्णांची विषाणू चाचणी करण्यात आली. त्यापैकी १ हजार ६२६, म्हणजेच सुमारे ९७ टक्के रुग्णांमध्ये विषाणू नियंत्रणात असल्याचे स्पष्ट झाले.
वेळेवर तपासणी, निदान आणि नियमित उपचारामुळे रुग्णांचे आरोग्य नियंत्रणात ठेवण्यास मदत होत आहे. नागरिकांनी गैरसमज दूर करून वेळेत तपासणी करून घ्यावी, तसेच निदान झाल्यास तातडीने उपचार सुरू करावेत, असे आवाहन जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाने केले आहे.