Raigad Water Crisis: माणगाव तालुक्यातील भूजल पातळीत चिंताजनक घट; भविष्यात भीषण पाणीटंचाईचे सावट

काळ नदीची पातळी खालावली; जलजीवन मिशनच्या अपूर्ण योजनांमुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याची चिंता वाढली.
Raigad Water Crisis
Raigad Water CrisisPudhari
Published on: 
Updated on: 

अरुण पवार

माणगाव: रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये भूजल पातळीत घट नोंदवण्यात आली असून, माणगाव तालुकाही या संकटापासून दूर राहिलेला नाही. डोंगररांगांनी नटलेला, नद्या-नाले आणि हिरवाईने समृद्ध असलेला कोकण आज भूजलाच्या घटत्या साठ्यामुळे चिंतेच्या उंबरठ्यावर उभा आहे.

पावसाळ्यात धो-धो कोसळणारा पाऊस समुद्राकडे वाहून जात असताना जमिनीखालील पाण्याचा साठा मात्र अपेक्षित प्रमाणात वाढत नसल्याचे चित्र चिंताजनक आहे.

Raigad Water Crisis
Shaurya Ambure Youth Olympics: एसीएल शस्त्रक्रियेनंतरही शौर्याची कांस्यपदकावर मोहोर

रायगड जिल्ह्यातील पनवेल, अलिबाग, कर्जत, खालापूर, माणगाव आणि पेण यांसारख्या तालुक्यांमध्ये भूजल पातळी घसरल्याचे वृत्त समोर आले आहे. पोलादपूर तालुक्यात सर्वाधिक १.९० मीटर घट नोंदवल्याची माहिती प्रसिद्ध झाली आहे.

मागील वर्षी समाधानकारक पाऊस होऊनही भूगर्भातील जलसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे केवळ पावसाचे प्रमाण नव्हे, तर पावसाचे पाणी जमिनीत किती मुरते, याकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.

माणगाव शहराची जीवनदायिनी असलेल्या काळ नदीची पातळी ऑक्टोबर महिन्यापासूनच खालावू लागल्याने भविष्यातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काळ नदीच्या पाण्यावर शहरातील नागरिकांसह परिसरातील अनेक घटक अवलंबून आहेत.

नदीपात्रातील पाणीसाठा कमी झाल्यास त्याचा परिणाम भूजल पुनर्भरणावरही होऊ शकतो. उतेखोल येथील ३.५ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र काळ नदीवरील वाकडाई परिसरातील जॅकवेलमधून पाणी उचलते. या योजनेचा लाभ खांदाड, जुने माणगाव, नानोरे, भादाव आणि उतेखोल परिसराला मिळतो.

Raigad Water Crisis
Mumbai Narcotics Smuggling Network: मुंबईत अमली पदार्थ विक्रीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर; पैशांचे आमिष दाखवून जाळ्यात ओढल्याचा आरोप

मात्र, माणगाव शहर आणि भिरा पावर हाऊस परिसर वगळता तालुक्यातील सुमारे ७४ गट ग्रामपंचायतींच्या अखत्यारीतील ४०० हून अधिक गावांची तहान प्रामुख्याने विहिरी, तलाव आणि कूपनलिकांवर अवलंबून आहे.

भूजल पातळी घटल्यास सर्वप्रथम ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना त्याची झळ बसण्याची शक्यता आहे. विशेषतः डोंगराळ वाड्यावस्त्यांमधील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट अधिक त्रासदायक ठरू शकते.

'हर घर नल से जल' हे स्वप्न साकार करण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील १,४२२ मंजूर योजनांपैकी सुमारे ६०७ योजना अद्याप अपूर्ण असल्याची माहिती समोर आली आहे.

तांत्रिक अडचणी, कामांचा संथ वेग आणि प्रशासकीय विलंब यामुळे अनेक गावांतील नागरिकांना नळाद्वारे पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. परिणामी खासगी विहिरी आणि बोअरवेलमधून पाण्याचा उपसा वाढत असून भूजलावर अतिरिक्त ताण पडत आहे.

उन्हाळ्यात माणगाव तालुक्यातील दुर्गम भागातील गावांना आणि वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ वारंवार येते. तीव्र टंचाईच्या काळात काही प्रभावित गावांसाठी पाच ते सात टँकर तैनात करण्याचे नियोजन केले जाते, अशी माहिती उपलब्ध आहे. मात्र, टँकर हा कायमस्वरूपी उपाय ठरू शकत नाही. पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा पावसाळ्यातच जलसंधारणाची प्रभावी कामे करणे आवश्यक आहे.

...तरच उद्याची तहान भागेल

पाण्याचे संकट हे केवळ प्रशासनाचे नाही, तर प्रत्येक नागरिकाच्या अस्तित्वाशी जोडलेले आव्हान आहे. गावागावांत पाणी अडवा-पाणी जिरवा मोहिमा राबवणे, जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करणे, पावसाचे पाणी साठवणे, विहिरींचे पुनर्भरण करणे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज आहे.

आज विहिरींच्या तळाशी दिसणारे पाणी उद्या पूर्णपणे आटले, तर विकासाच्या गप्पांना काहीच अर्थ उरणार नाही. कोकणातील हिरवाई, नद्या आणि निसर्गसंपदा टिकवायची असेल, तर भूजलाचे संवर्धन करावेच लागेल.

अन्यथा भविष्यात पाण्यासाठी होणारी वणवण ही केवळ उन्हाळ्यापुरती मर्यादित राहणार नाही. पाणी निसर्ग देतो, पण ते जपण्याची जबाबदारी आपली आहे. आजच जागे होऊया; कारण पाण्याचा प्रत्येक थेंब उद्याच्या जीवनाचा आधार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.