

नाते : इलियास ढोकले
किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसमाधी, मेघडंबरी आणि राजसदर परिसर गेल्या आठ दिवसांपासून अंधारात असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पुरातत्व विभाग खडबडून जागा झाला. बुधवारी सायंकाळनंतर या परिसरातील बंद असलेली विद्युत व्यवस्था अखेर पूर्ववत करण्यात आली.
वीज मीटरपर्यंत पुरवठा सुरू असतानाही मीटरनंतरच्या अंतर्गत विद्युत व्यवस्थेतील बिघाडामुळे परिसर अंधारात होता. या प्रकारा बाबत किल्ले रायगड परिसरातील हॉटेल चालक मालक संघटना अध्यक्ष रघुवीर देशमुख यांसह शिवप्रेमी आणि कोकण कडा मित्र मंडळाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. विद्युत व्यवस्था तातडीने पूर्ववत न झाल्यास आंदोलनाचा इशारा मंडळाचे अध्यक्ष रोहित पवार यांनी दिला होता.