

रायगड: खरीप हंगाम २०२६ मध्ये रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात ‘ट्रिगर-१’ व ‘ट्रिगर-२’ नुसार दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध राहावा आणि संभाव्य चारा टंचाई टाळता यावी, यासाठी रायगड जिल्ह्याच्या महसुली हद्दीतून इतर जिल्ह्यांत तसेच राज्याबाहेर सर्व प्रकारच्या ओल्या व सुक्या चाऱ्याची वाहतूक व विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये हे आदेश जारी केले आहेत.
जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, रायगड यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा मोठ्या प्रमाणावर इतर जिल्ह्यांत विक्रीसाठी पाठविला जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे भविष्यात जिल्ह्यात चारा टंचाई निर्माण होऊन पशुधनाच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. तसेच चारा उपलब्धतेवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने हा प्रतिबंधात्मक निर्णय घेतला आहे.