

अलिबाग : नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. दरवर्षी पावसाळ्यात येणाऱ्या उधाणाच्या पाण्यामुळे किनारपट्टीलगतचे संरक्षणात्मक बंधारे कमजोर झाले आहेत; मात्र त्यांच्या दुरुस्तीसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठविलेला 75 कोटी 86 लाख रुपयांचा प्रस्ताव मागील चार वर्षांपासून प्रलंबित असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भागातील खारबंदिस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अलिबाग, मुरूड आणि श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यांवर भरतीमुळे मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून निधीची मागणी केली होती. सीआरझेड नियमांमुळे या कामांना मंजुरी मिळण्यात विलंब झाला; मंजुरी मिळाल्यानंतरही निधीअभावी कामे सुरू होऊ शकलेली नाहीत.
जिल्ह्यातील खारभूमी भागात भात, नारळ आणि मत्स्यशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. ही जमीन उच्चतम भरती रेषेपेक्षा सुमारे दोन मीटर खाली असल्याने खारे पाणी शेतांमध्ये सहन शिरते. त्यामुळे शेती नापीक होण्याचा धोका वाढला असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. खारभूमी विभागाने उभारलेल्या बंधाऱ्यांची दरवर्षी डागडुजी आवश्यक असते. पूर्वी ग्रामस्थ लोकसहभागातून ही कामे करत होते; मात्र सध्या शासकीय मदत वेळेत न मिळाल्याने दुरुस्ती रखडली आहे.
येत्या पावसाळ्यापूर्वी तातडीने निधी उपलब्ध करून बंधारे दुरुस्त करण्याची मागणी शेतकरी व स्थानिकांकडून केली जात आहे.कोकणात 32 हजार 514 हेक्टर एवढे खारभूमी क्षेत्र आहे. यातील सर्वाधिक तब्बल 22 हजार 559 हेक्टर क्षेत्र रायगड जिल्ह्यात आहे. या क्षेत्रासाठी खारलॅण्ड विभागाने 165 सरकारी बंदिस्ती योजना आखल्या आहेत; पण, या योजना राबविण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्याची ओरड वेळोवेळी केली जात आहे. अनेकदा खारबंदिस्ती फुटल्याने शेतात खारे पाणी शिरते. यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. या योजनांसाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत, मात्र त्यापासून कोणताही लाभ येथील शेतकऱ्यांना मिळाला नसल्याचे दिसून येत आहे.
मत्स्यशेतीही धोक्यात
भरतीच्या वेळेला वेगाने आलेले पाणी तलावात घुसून तलावांचे बांध फुटतात व बीज व विक्रीयोग्य मासे वाहून जाऊन त्यांचेदेखील नुकसान होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने येथील भातशेती पाण्याने पूर्णपणे भरलेली आहे. अशा स्थितीत शेत तलावात सोडलेले मत्स्यजीव वाहून गेलेले आहेत, असे शहापूर येथील यशवंत पाटील यांनी म्हटले आहे.इधरमतर खाडीकिना-यावरील शहापूर-थेरंडच्या पूर्व भागातील एकूण 10 खाड्या नादुरुस्त झाल्या आहेत. यातून मोठ्या प्रमाणात खारे पाणी परिसरात पसरत असून परिस्थिती गंभीर होत आहे; पण शासकीय उदासीनता, दप्तर दिरंगाई, अपुरा निधी आणि योग्य देखभालीअभावी बंदिस्ती कमकुवत होत आहे.
बांधबंदिस्तीचा प्रस्ताव कोकण सौम्यकरण योजनेतून राज्य शासनाकडे पाठवलेला आहे; मात्र अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. याबरोबरच नैसर्गिक सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे प्रस्ताव पाठविलेले आहेत.
सागर पाठक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, रायगड