

तळा : संध्या पिंगळे
तळा तालुक्यातील एकमेव अमेरिकन अर्थसाहय्याने बांधलेले व सिंचन क्षेत्रावर शेती होणारे वावेहवेली धरण आहे. परतुं गेल्या अनेक वर्षांपासून धरणाचे कालवे नादुरुस्त आहेत.या भात शेतीला कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची कालव्यांच्या दुरूस्ती अभावी शेतीला पाणी नसल्याने कालवा दुरूस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होताना पहावयास मिळत आहे.
या धरणाचे 1987 व 1988 ला काम सुरू झाल्यानंतर 1990 ला या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. त्याचवर्षी प्रत्यक्ष सिंचनास सुरूवात झाली. धरणात 3.17 दशलक्ष घनमीटर पाणी क्षमता आहे. त्यामधील 3.13 दशलक्ष घनमीटर पाणी उपयुक्त आहे. 0.4 निरूपयोगी पाणी आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून हे पाणी शेतीला मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एप्रिल मे महिन्यात रब्बी पिकांचा हंगाम सुरू आहे. या कालावधीत भात शेतीची कापणी मोठ्या प्रमाणात होत होती.
डावा कालवा हा दगडी बांधकाम सिमेंट मातीचा असून सध्या कालव्याचे बेडकॉक्रिटीकरण निखळून गेले आहेत. त्यामुळे या कालव्यातून पाणी लिकेज आहेत यामुळे शेवटपर्यंत पाणी जात नाही. उजवा कालवा बंदिस्त नलिका असूनही मुख्य पाईप लाईन शेतांमधून गेली आहे. ही पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटल्याने पाणी सोडल्यानंतर फुटलेल्या पाईप मधून बाहेर जातो. त्यामुळे पाणी शेवटपर्यंत पोहचत नाही, याचा शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
शेतकऱ्यांना हव्या त्या पध्दतीने शेती करता येत नाही. हा परिणाम होत आहे. पर्यायाने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तसेच आता या समस्यांमुळे शेतकरी वर्ग रब्बी पिकाकडे दुर्लक्ष करत आहे. आतातर शेतकरी वर्ग रब्बी हंगामात भातशेती करत नाही हे चित्र पहावयास मिळत आहे. कालव्यांची दुरूस्ती व्हावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. जर का कालव्याची दुरूस्ती झाली तर पुन्हा उन्हाळी भातशेती या भागात बहरेल.
या वावेहवेली धरणाच्या ज्या भागात धरणाच्या पाण्याचा ओलावा आहे. त्या भागात आता तरुण वर्ग ही शेतीकडेवळून भाजीपाल्याचा पिक काढत आहेत. त्यामधे वांगा, कारली, दुधी भोपळा, भेंडी, मिरची, टॅमेटो, कडधान्य इत्यादी पिके घेत आहेत. शेतकरी वर्गातून म्हटले जात आहे की धरणाचे कालवे त्वरीत दुरूस्त करावे. कालवे दुरूस्ती न झाल्याने आम्हा शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
20 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली
वावेहवेली धरणाअंतर्गत सिंचना साठी वावेहवेली, बामणघर, अंबेली, राणेचीवाडी, खैराट या गावांतील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणीपुरवठा होतो. यामधे एकूण 221 हेक्टर सिंचन क्षेत्र आहे. यापैकी डाव्या कालव्यातून 101 हेक्टर सिंचन क्षेत्र तर उजव्या कालव्यातून 120 हेक्टर सिंचन क्षेत्र पाईप लाईनने केला जात होता. एवढे क्षेत्र सिंचनाखाली येत होते. मात्र आजमितीस कालव्यांच्या नादुरूस्तीमुळे दोन्ही कालव्यातून पाणी नाही तरीही काही शेतकरी अंदाजे 20 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र ओलिताखाली घेत आहेत. यामुळे या दोन्ही कालव्यांची दुरुस्तीची कामे होणे गरजेचे आहे.