Maharashtra Unseasonal Rain Crop Damage: अवकाळी पाऊस-गारपिटीने पुणे जिल्हा हादरला; पिकांचे प्रचंड नुकसान

बारामती, दौंड, हवेली, शिरूर भागात वादळी वाऱ्यासह गारांचा तडाखा; शेतकऱ्यांची मदतीची मागणी
Unseasonal Rain Crop Damage
Unseasonal Rain Crop DamagePudhari
Published on
Updated on

शिवनगर: बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील पणदरे, पवईमाळ, धुमाळवाडी तथा पणदरे पंचक्रोशीतील गावांसाठी बुधवार (दि. 1) ची दुपार निसर्गाचे तांडव दाखवणारी ठरली. अचानक बदललेल्या हवामानामुळे आलेल्या भीषण वादळी वाऱ्यासह आणि मोठ्या आकाराच्या गारपिटीने संपूर्ण पंचक्रोशीला झोडपून काढले. या नैसर्गिक आपत्तीत पिकांचे अक्षरशः मातेरं झालं असून, शेतकरी पुन्हा एकदा संकटाच्या गर्तेत सापडला आहे. डोळ्यांदेखत होत्याचे नव्हते झाले असल्याचे चित्र या वेळी पाहावयास मिळाले.

प्रशासनाला जमिनीवर उतरून करावे लागणार काम

निसर्गाचा लहरीपणा आता नवीन राहिला नाही, पण दरवेळी नुकसानीनंतर पंचनाम्यांचे जे ‌‘फार्स‌’ रंगवले जातात, त्यातून शेतकऱ्याच्या हातात काहीच पडत नाही. पणदरे पंचक्रोशीतील हे नुकसान इतके मोठे आहे की, केवळ कागदी घोडे नाचवून चालणार नाही; प्रशासनाला आता जमिनीवर उतरून काम करावे लागेल. शासनाने तातडीने ‌‘स्पॉट पंचनामे‌’ करून नुकसानीचा अहवाल सादर करावा. केळी आणि फळबागांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे. यासह गहू आणि हरभरा पिकाची नुकसानभरपाई द्यावी.

Unseasonal Rain Crop Damage
Pune Water Supply Protest: मांजरीत पाणीटंचाईवर महिलांचे बेमुदत आंदोलन

उदयसिंहकाका धुमाळ, संचालक, खरेदी-विक्री संघ, बारामती

पूर्व हवेली तालुक्यातील उरुळी कांचन परिसरासह पश्चिम दौंड तालुक्यातील गावांना अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. बुधवारी (दि. 1) सायंकाळी 4 वाजल्यानंतर वादळी-वाऱ्यासह गारांच्या सरी कोसळल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळून विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. सोमवारी (दि. 30) पावसाने हुलकावणी बसली. मंगळवारी (दि. 31) व बुधवारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत उरुळी कांचन, शिंदवणे, वळती, तरडे या भागांना झोडपले.

तसेच, दौंड तालुक्याच्या पश्चिम भागातही या पावसाचा मोठा परिणाम जाणवला. वादळी-वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे कांदा, गहू, मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, काही ठिकाणी कांद्याची पिके वाहून गेली आहेत. फळबागांतही पडझड झाली असून, झाडेही उन्मळून पडली. काही भागांत विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. जवळपास 2 तास सुरू असलेल्या या पावसामुळे उन्हाळी कांदा पिकावर मोठा परिणाम होणार आहे. प्रशासनाने पंचनामा करून तातडीने मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Unseasonal Rain Crop Damage
Pune Supari Killing Case: 75 लाखांच्या सुपारी प्रकरणात पिस्तूल पुरवणारा जेरबंद; दोन वर्षांनी पोलिसांच्या ताब्यात

लाखणगाव परिसरातील पिकांचे मोठे नुकसान

आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव परिसराला बुधवारी (दि. 1) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या अवकाळी गारपिटीच्या पावसाने जोरदार तडाखा बसला. यामध्ये कांदा, गहू आणि ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, महसूल विभागाने तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. सध्या परिसरात कांदा काढणीची कामे सुरू होते, तर गहू काढणीसाठी तयार झाला होता.

मळणीची तयारी सुरू असतानाच अचानक गारांसह मुसळधार पाऊस कोसळला. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत झालेल्या या गारपिटीने पिकांचे अक्षरशः नुकसान केले. कांद्याची पात जमिनीवर आडवी झाली, गहू पिके पूर्णपणे पडली, तर उसाची पाने गारांच्या माऱ्याने फाटून गेली. शेतकऱ्यांनी कष्टाने उभे केलेले पीक डोळ्यांसमोर उद्ध्‌‍वस्त होताना पाहून त्यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. आधीच वाढत्या खर्चामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर आता या नैसर्गिक संकटामुळे दुहेरी आर्थिक फटका बसला आहे.

Unseasonal Rain Crop Damage
Pune RMC Plant Pollution: पुण्यात बेकायदेशीर आरएमसी प्लांट्सवर कारवाईची मागणी; रहिवासी भागांत प्रदूषणाचा वाढता धोका

पिंपरखेड, जांबूत येथे गारांसह पाऊस

शिरूर तालुक्याच्या बेट भागातील पिंपरखेड आणि जांबूत परिसरात बुधवारी (दि. 1) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह आणि गारांच्या अवकाळी पावसाने मोठी दाणादाण उडवून दिली. दिवसभर असलेल्या कडक उन्हाच्या चटक्यानंतर आलेल्या या संकटामुळे काढणीला आलेल्या उन्हाळी कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. बुधवारी (दि. 1) सकाळपासूनच परिसरात उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर होता; मात्र, दुपारी साडेचारच्या सुमारास हवामानात अचानक बदल झाला.

सुरुवातीला अत्यंत वेगवान वादळी वारा सुटला आणि त्यानंतर काही वेळातच छोट्या आकाराच्या गारांसह पावसाने हजेरी लावली. या पावसाने चांडोह, जांबूत, पिंपरखेड परिसरात शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. सध्या शेतात उन्हाळी कांदा काढणी सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदा काढून शेतातच आरणी लावल्या आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे शेतातील कांद्याचे नुकसान झाले असून, तो भिजल्याने सडण्याची भीती निर्माण झाली आहे. काढणी सुरू असताना पाऊस आल्याने शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली.

गारांच्या माऱ्यामुळे चारा पिके, फळबागा आणि पालेभाज्यांचेही नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर वीजपुरवठाही खंडीत झाला होता. ऐन हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे महसूल विभागाने तातडीने पंचनामे करावेत आणि पीडित शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी पिंपरखेड आणि जांबूत परिसरातील ग््राामस्थांकडून केली जात आहे.

Unseasonal Rain Crop Damage
Maharashtra Land Records Reform: भूकरमापक पद रद्द; ‘परिरक्षण भूमापक’ नव्या संवर्गाला मंत्रिमंडळाची मंजुरी

गारपिटीने पोल्ट्री शेडचे नुकसान

आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव (धरमवस्ती) येथे बुधवारी (दि. 1) सायंकाळी अचानक आलेल्या वादळी-वाऱ्यासह गारपिटीने मोठे नुकसान झाले. सुरू असलेले पोल्ट्री शेडचे बांधकाम कोसळले. लाखनगाव येथील विक्रम राजाराम धरम यांनी 10 हजार पक्ष्यांची क्षमता असलेले सुमारे 250 फूट लांबीचे पोल्ट्री शेड उभारण्याचे काम हाती घेतले होते. लोखंडी सांगाडा उभारून बांधकाम अंतिम टप्प्यात असताना अचानक आलेल्या अवकाळी पावसासह जोरदार वाऱ्याने शेडच्या दोन्ही बाजूंच्या भिंती कोसळल्या. त्यामुळे व्यवसाय सुरू होण्यापूर्वीच मोठा फटका बसला आहे. या प्रकल्पासाठी विविध कार्यकारी सोसायटीकडून आर्थिक साहाय्य घेण्यात आले होते. महसूल विभागाने तत्काळ पंचनामा करून संबंधित शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग््राामस्थांनी केली आहे.

Unseasonal Rain Crop Damage
Pune Unseasonal Rain: पुण्यात अवकाळी पावसाचा धडाका; खराडी-चंदननगरमध्ये गारपीट

नागरगावचे शेतकरी चिंताग्रस्त

नागरगाव (ता. शिरूर) परिसरात तीन ते चार दिवसांपासून जोरदार अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. यामुळे येथील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. शिरूर तालुक्यातील नागरगाव, आंधळगाव, निर्वी, गुनाट, कोळगाव डोळस आदी परिसरात बुधवारी (दि. 1) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. तसेच काही भागांत गारपीट झाली आहे. यामुळे हाताशी आलेल्या कांदा व गहू पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. सध्या अनेक शेतकऱ्यांनी कांदा काढणीस सुरुवात केली आहे.

मात्र, मजुरांच्या टंचाईमुळे कांदा काढली वेळेत पूर्ण होताना दिसत नाही. कांदा काढणीसाठी प्रतिएकर सुमारे 12 ते 14 हजार रुपये मजुरी आकारली जाते. मात्र, स्थानिक मजूर उपलब्ध होत नसल्याने बाहेरील मजुरांवर शेतकऱ्यांना अवलंबून रहावे लागते. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी शेतातच कांदा वाळविण्यासाठी ठेवला आहे. तर काहींनी चाळीत कांदा साठवलेला आहे. पावसाचा जोर वाढल्याने शेतातील कांदा भिजला आहे. तो वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली. या पावसामुळे कांद्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊन त्याचा फटका बसण्याची शक्यता असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news