

रायगड : रायगड जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात मद्यविक्रीने उच्चांक गाठला असून, तब्बल 43 लाख 27 हजार 525 बल्क लिटर दारू तळीरामांनी रिचवली. यामध्ये बीअरची विक्री सर्वाधिक झाल्याचे राज्य उत्पादन शुल्क रायगड विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. देशी व विदेशी दारूपेक्षा बीअरला मद्यपींची पसंती मिळाल्याने वाईनच्या विक्रीत मात्र लक्षणीय घट नोंदवली गेली.
डिसेंबरमध्ये नाताळसह थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी रायगड जिल्ह्यात पर्यटक दाखल झाले होते. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, कॉटेज पर्यटकांनी फुल्ल होते. दहा लाखांहून अधिक पर्यटकांनी या कालावधीत जिल्ह्याला भेट दिल्याने मद्यविक्रीत प्रचंड वाढ झाली. अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यविक्रीचे परवानेही देण्यात आले. आकडेवारीनुसार, डिसेंबर महिन्यात 43 लाख 27 हजार 525 बल्क लीटर इतकी दारु मद्यपींनी रिचवल्याची माहिती समोर आली. त्यामध्ये 9 लाख 51 हजार 381 बल्क लीटर देशी दारु, 9 लाख 14 हजार 426 बल्क लिटर विदेशी दारू, 24 लाख 96 हजार 960 बल्क लीटर बीअर आणि 64 हजार 758 वाईन विकली गेली.
विदेशी दारूच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने 650 रुपयांची बाटली 900 रुपयांपर्यंत गेली असून, प्रत्येक क्वॉर्टरमागे साठ रुपयांची वाढ झाली. त्यामुळे यंदा बीअर पिण्याकडे मद्यपींचा कल अधिक दिसून आला.
विदेशी दारूच्या विक्रीमध्ये भरमसाट वाढ करण्यात आली. 150 रुपयांना मिळणारी दारू 200 हून अधिक रुपयांनी बाजारात विकण्यात आली. त्यामुळे यंदा विदेशी दारूपेक्षा बीअर खरेदीला मद्यपींना पसंती दर्शविली. त्याचा परिणाम विदेशी दारूच्या विक्रीवर झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
दारू विक्री : देशी - 9 लाख 51 हजार 381; विदेशी - लाख 14 हजार 426; बीअर - 24 लाख 96 हजार 960; वाईन - 64 हजार 758