

अलिबाग: मुरूडमध्ये सक्रिय असणा-या चरस विक्रेत्यांचे रॅकेट रायगड पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. या रॅकेटमधील एकूण 13 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घतले असून 13 लाख 61 हजारांचे चरस जप्त केले आहे. याबाबतची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी शुक्रवारी दि.11 पत्रकार परिषदेत दिली.
मुरूडमधील 29 जून रोजी नाकाबंदी सुरू असताना शिघे्र चेक पोस्ट येथे चेकिंगदरम्यान आरोपी अलवान निसार दफेदार वय19, रा.सिध्दी मोहल्ला मुरूड हा त्याचा सहकारी आरोपी राजू खोपटकर रा. गावदेवी पाखाडी मुरूड याच्यासह स्कुटी नं.एमएच-48 बीके 9251वरून जात असताना पोलिसांना पाहून मागे बसलेला आरोपी राजू खोपटकर हा पळून गेला. त्यामुळे चेक पोस्टवरील पोलिसांनी अलवान दफेदारला अडवून त्यांची स्कुटी तपासली असता स्कुटीच्या डिकीमध्ये 776 ग्रॅम चरस पोलिसांना आढळले. पोलिसांनी तातडीने अलवान दफेदार याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे अधिक चैकशी केली असता, त्याने चरस विक्री करीत असल्याचे सांगून त्याच्या साथीदारांची नावेही सांगितली आहेत. त्याच्या साथीदारांमध्ये मुख्य डिलर विशाल रामकिशन जैसवाल वय 27, मु.पो. पोखरभिंडा, पोलीस ठाणे फरेंदा, जिल्हा महाराजगंज, उत्तर प्रदेश हा आहे. त्याचप्रमाणे अनुप राजेश जैसवाल रा. मुरूड गावदेवी पाखाडी, अनुज विनोद जैसवाल, वय 19 रा. मजगांव, ता. मुरूड यांच्या मदतीने आरोपी आशिष अविनाश डिगे वय 25 रा. काशिद, ता.मुरूड, प्रणित पांडुरंग शिगवण वय 25 रा. सर्वे, ता.मुरूड, आनस इम्तियाज कबले वय 20 रा. पेठ मोहल्ला मुरूड, ता.मुरूड, वेदांत विलास पाटील वय 18 रा. मजगांव. ता. मुरूड, साहिल दिलदार नाडकर वय 27 वर्षे, रा. रोहा वरचा मोहल्ला, ता.रोहा, अनिल बंडु पाटील वय 40, रा. मांडा, कल्याण, सुनिल बुधाजी शेलार 34 वर्षे, मु.पो. फलेगांव, ता.कल्याण, जि.ठाणे, राजु खोपटकर रा. गावदेवी पाखाडी मुरूड खुबी माखनसिंग भगेल रा.मुरूड, ता. मुरूड या मदतीने अवैध धंदा करीत होते.
मुख्य डिलर आरोपी विशाल जैसवाल हा नेपाळ, उत्तर प्रदेश येथून चरस आणत होता. तर त्याचे साथीदार आरोपी अनुप जैसवाल व अनुज जैसवाल यांच्यामार्फत आरोपी आशिष डिगे व प्रणित शिगवण इतर आरोपींच्या मदतीने विकत होते. अनुप जैसवाल व त्याचे साथीदारांकडून पोलिसांनी 13 लाख 61 हजार रूपये किमतीचा एकूण 2 किलो 6,59 ग्रॅम चरस हस्तगत केला आहे.
या गुन्हयाचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलिस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी मुरुड पोलिस ठाणे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, सपोनि. विजयकुमार देशमुख, पोसई. अविनाश पाटील, हवालदार जनार्दन गदमले, हवालदार हरी मेंगाल, पोलिस नाईक किशोर बठारे, शिपाई अतुल बारवे यांनी केला आहे. ज्यांच्या अधिकारक्षेत्रात हा गुन्हा घडला आहे त्या अधिका-याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी सांगितले