

रायगड : गेला तीन दिवसांत रायगड जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या 14 घटना समोर आल्या आहेत. लग्नाचे आमिष दाखवून, समाजमाध्यमावरून ओळख मैत्रीच्या नावाखाली फसवणूक करून अत्याचार आणि विवाहित महिलांचा माहेरहून पैसे आणण्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला आहे. यात लग्नाचे आमिष दाखवून आठ अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आले आहेत. अलिबागसह तळा तालुक्यात महिला अत्याचाराच्या अधिक घटनासमोर आल्या असल्याने खळबळ उडाली आहे.
हे गुन्हे मागील काही दिवसात घडले असून गेली तीन दिवसात याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. यात कर्जत पोलीस ठाणे हद्दीत 1 जुलै रोजी गुन्हा दाखल झाला असून आरोपीत रिलेशनशिपमध्ये असताना समाजमाध्यमावर फोटो टाकून मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे. तसेच इन्स्टा व्हिडीओ कॉल करून फिर्यादी यांचा पाठलाग केला.
दुसरा गुन्हा पाली पोलीस ठाणे हद्दीतील आहे. आरोपीने पिडीत ही अल्पवयीन आहे हे माहीत असताना देखील तिला मंदिरात नेवुन तिचे सोबत लग्न केले व तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याने ती गरोदर राहिली.
अलिबाग पोलीस ठाणे हद्दीतील एका गुन्ह्यात एका महिलेला वेळोवेळी लग्नाचे खोटे आमिश दाखवुन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापीत केले. सदर महिला गरोदर राहील्याने जन्माला आलेल्या बाळाची जबाबदारी घेण्यास आरोपीने नकार दिला. अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत आणखी एक घटना अलिबागमध्ये घडली. खालापूर येथील आरोपीने फिर्यादी यांचे सोबत ओळख करुन लग्नाचे खोटे आमिश दाखवुन फिर्यादी यांच्यावर अत्याचार केले. यातील पीडिता ही गरोदर राहिली.
आणखी एका घटनेत अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत एका कंपनीमधील कोपरखैरणे येथील आरोपीने अलिबागमध्ये पार्टी दरम्यान सहकारी महिलेवर अत्याचार केले आहेत. खोपोली पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या गुन्ह्यात मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहित असतांना देखिल तिचे अज्ञानपणाचा फायदा घेवुन तिचे सोबत इंस्टाग्रामवर ओळख वाढवुन प्रेम संबंध ठेवले आणि सदर बाबत कोणास सांगु नकोस अशी धमकी दिली. त्यानंतर अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत आणखी एक घटना घडली. एका पीडितेचे पति मयत आहेत. ती एकटी असल्याचा गैरफायदा घेवून आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर इच्छेविरूध्द् जबरदस्तीने शारिरीक संबध प्रस्थापित केले. त्यानंतर आरोपीने फिर्यादी सोबत लग्न करण्यास नकार देत फिर्यादी यांची फसवणूक केली आहे.
तळा तालुक्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. एकूण आठ घटना तालुक्यातून समोर आल्या आहेत. त्यात काही प्रकरणात अल्पवयीन मुलींचे बालविवाह करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांच्या शारीरिक अत्याचार करण्यात आले. यात या अल्पवयीन मुली या गरोदर असल्याचे वैद्यकीय तपासात आढळून आहे. याप्रकरणी तळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महाड शहर पोलीस ठाणे हद्दीत 30 जून फिर्यादी यांचे राहते घरातून त्यांची पत्नी व लहान मुलगा हे राहते घरातून अज्ञात ईसमाने फूस लावून पळवून नेले आहे. महाड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पनवेल तालुक्यातील करंजाडे येथे राहणार्या आणि सध्या मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका महिला पोलिस कर्मचार्याचा छळ केल्याप्रकरणी तिच्या पतीसह एकूण 10 नातेवाईकांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरू असून 1 जुलै रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली.
या घटनामुळे रायगड जिल्ह्यात महिला अत्याचारांचा आणि बालविवाहाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदी नुकतीच आंचल दलाल यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्यासमोर जिल्ह्यातील बालविवाहाच्या कुप्रथेला रोखणे आणि अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषणाचे प्रकार थोपवण्याचे आव्हान असणार आहेत. ग्रामीण भागात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना अधिक आहेत.