Pudhari Maha Icon Award : रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांना 'पुढारी महाआयकॉन' पुरस्कार प्रदान

ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
Pudhari Maha Icon Award
ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांना 'पुढारी महाआयकॉन' पुरस्कार प्रदान करताना दिसत आहेत. तर शेजारी निरुपणकार डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी, श्री. राहुलदादा धर्माधिकारी, दैनिक 'पुढारी'चे निवासी संपादक शशिकांत सावंत, रायगड न्यूज ब्युरो चीफ जयंत धुळप, प्रतिनिधी सुवर्णा दिवेकर, राजेश जागरे. (छायाचित्र -सचिन असरानी)
Published on
Updated on

रायगड : राज्यातील अत्यंत प्रतिष्ठेचा मानला गेलेला 'पुढारी महाआयकॉन' पुरस्कार प्रशासकीय सेवा क्षेत्राकरिता रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. गुरुवारी गुरुपुष्यामृतयोगाच्या शुभमुहूर्तावर, ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी हा सोहळा संपन्न झाला. जिल्हाधिकारी जावळे यांचे प्रशासकीय सेवेतील कार्य उत्तम असून पुढारी वृत्तपत्र समूहाने योग्य व्यक्तिमत्त्वाची निवड केली आहे, अशा शब्दांत कौतुक करत डाॅ. श्री. आप्पासाहेबांनी त्यांना उत्तरोत्तर प्रगतीचे आशीर्वाद दिले.

या हृद्य सोहळ्याप्रसंगी निरुपणकार डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी, श्री. राहुलदादा धर्माधिकारी, दैनिक 'पुढारी'चे निवासी संपादक शशिकांत सावंत, न्यूज ब्युरो चीफ जयंत धुळप, प्रतिनिधी सुवर्णा दिवेकर आणि राजेश जागरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Pudhari Maha Icon Award
विविध योजनांतून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास : पालकमंत्री बोर्डीकर

लोकाभिमुख कामगिरी

रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी २०२४ पासून रायगड जिल्ह्यात आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. सरकारच्या कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत अत्यंत संवेदनशीलतेने पोहोचवल्याबद्दल हा गौरव करण्यात आला आहे. त्यांनी पर्यटन, उद्योग आणि कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी केली असून, उद्योजकांना प्रशासकीय जाच होऊ नये व सुरक्षितता मिळावी यासाठी सुरू केलेला 'सेतू' उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला आहे.

विविध विकास प्रकल्प आणि कृषी क्षेत्राला चालना

त्यांच्याच दूरदृष्टीने आणि मार्गदर्शनाखाली मुरुड येथे १० कोटी रुपयांचा बांबू क्लस्टर प्रकल्प उभारण्यात आला आहे. याशिवाय हमरापूर येथील १० कोटी रुपयांचा गणेश आयडॉल क्लस्टर आणि तळोजा येथील ३० कोटी रुपयांचा इंजिनीअरिंग क्लस्टर हे प्रकल्प प्रस्तावित आहेत. रायगडचा प्रसिद्ध पांढरा कांदा अधिक लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी त्याचे क्षेत्र वाढविण्यावर भर दिला असून, शेतकऱ्यांनी स्वतः त्याचे बीज तयार करावे यासाठी पुढाकार घेतला आहे.

सुवर्णपदकापासून आयएएस पर्यंतचा प्रवास

परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतून प्राथमिक शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या किशन जावळे यांनी पुढे बी.एस्सी., एम.एस्सी. आणि एलएल.बी. या पदव्या सुवर्णपदकासह प्राप्त केल्या. १९९३ मध्ये मृद व जलसंधारण विभागाचे उपसंचालक म्हणून त्यांनी शासकीय सेवेत प्रवेश केला. त्यानंतर लातूरचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. २०२१ मध्ये त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) निवड झाली आणि त्यानंतर त्यांनी कोकण विभागाचे अप्पर आयुक्तपदही भूषवले.

Pudhari Maha Icon Award
Cashew Processing Centre : सिंधुदुर्ग जिल्ह्यातही होणार काजू प्रक्रिया व निर्यात सुविधा केंद्र

'फेम इंडिया' मासिकाकडून देशातील उत्कृष्ट जिल्हाधिका-यांमध्ये समावेश

सध्या ते रायगड जिल्ह्यात आदिवासी बांधव आणि मत्स्य व्यावसायिक यांच्या उन्नतीसाठी विविध मोहिमा राबवत आहेत. त्यांच्या या अष्टपैलू कामगिरीची दखल 'फेम इंडिया' मासिकानेही घेतली आहे. देशातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १०० जिल्हाधिकाऱ्यांच्या सर्वेक्षणात किशन जावळे यांचा समावेश झाला असून, महाराष्ट्रातील केवळ पाच जिल्हाधिकाऱ्यांना हा बहुमान मिळाला आहे. त्यांच्या या अविरत लोकसेवेचा सन्मान करत त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news