Raigad District Hospital | रायगड जिल्हा रुग्णालयावर १५ कोटी खर्च : विद्युतसुरक्षा, इमारतीची स्थिती, मनुष्यबळाचा प्रश्न कायम

५१ टक्के पदे रिक्त; रुग्णालयाचे विद्युत ऑडिट नेमके कधी झाले याबाबत प्रश्नचिन्ह
Raigad District Hospital Infrastructure Issues
Raigad District Hospital Infrastructure IssuesPudhari
Published on
Updated on

Raigad District Hospital Infrastructure Issues

सुवर्णा दिवेकर

अलिबाग : रुग्णांच्या जीविताशी थेट संबंधित असलेल्या रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णालयाच्या विद्युत यंत्रणेचे नियमित ऑडिट झालेले नाही. तसेच विविध संवर्गांतील तब्बल ५१ टक्के पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या १३ वर्षांत रुग्णालयावर सुमारे १५ कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगितले जात असतानाही विद्युतसुरक्षा, इमारतीची स्थिती आणि मनुष्यबळाचा प्रश्न कायम असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित होत आहेत.

अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. आयसीयू, ऑपरेशन थिएटर, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन यंत्रणा तसेच अन्य अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे अखंड वीजपुरवठ्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे अशा संवेदनशील ठिकाणी विद्युत यंत्रणेची नियमित तपासणी आणि ऑडिट होणे अत्यावश्यक आहे. मात्र, रुग्णालयाचे विद्युत ऑडिट नेमके कधी झाले, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

Raigad District Hospital Infrastructure Issues
Raigad News: नको ते हाल, नको ती वेठबिगारी! आंध्र प्रदेशातील कोळसा खाणींतून रायगडच्या ३९ कातकरी बांधवांची थरारक सुटका

२४ ऑगस्ट रोजी अमरावती जिल्हा महिला रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यातील रुग्णालयांच्या विद्युत आणि अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. याच पार्श्वभूमीवर अलिबाग जिल्हा रुग्णालयाचे विद्युत ऑडिट झाले आहे का, असा सवाल शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी उपस्थित केला आहे. दुर्घटना घडल्यानंतर चौकशी समित्या नेमण्यापेक्षा संभाव्य धोके आधीच ओळखून ते दूर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शॉर्टसर्किटनंतर पंचनामा नको; आधीच खबरदारी हवी

ऑगस्ट २०२१ मध्ये जिल्हा रुग्णालयातील अपंग विभागात शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. त्यामुळे रुग्णालयातील विद्युत सुरक्षेचा प्रश्न नवीन नाही. यानंतरही विद्युत यंत्रणेची नियमित तपासणी, देखभाल आणि ऑडिट याबाबत ठोस माहिती समोर येत नसल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Raigad District Hospital Infrastructure Issues
Loan Fraud Raigad: लोन मंजूर करून देतो’ म्हणत नागरिकांना गंडा; करंजाड्यातील बनावट कॉलसेंटरवर पोलिसांचा छापा

विद्युत बिघाड अथवा शॉर्टसर्किटची घटना घडल्यास सामान्य रुग्णांसोबतच आयसीयू, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संभाव्य धोके शोधून विद्युत यंत्रणेतील त्रुटी तातडीने दूर करण्याची गरज आहे.

१९४ पैकी ९९ पदे रिक्त

रुग्णालयातील मनुष्यबळाची स्थितीही चिंताजनक आहे. विविध संवर्गांतील १९४ मंजूर पदांपैकी केवळ ९५ पदे भरलेली असून ९९ पदे रिक्त आहेत. म्हणजेच मंजूर पदांपैकी जवळपास ५१ टक्के पदांवर नियुक्त्या झालेल्या नाहीत.

Raigad District Hospital Infrastructure Issues
Raigad News : आंबेगणी घाटात अपघातांचा धोका वाढला

तज्ज्ञ डॉक्टरांची ४२ पदे मंजूर असताना केवळ १६ पदे भरलेली असून २६ पदे रिक्त आहेत. अधिपरिचारिकांच्या ९६ मंजूर पदांपैकी ४१ पदे रिक्त आहेत. याशिवाय सिस्टर ट्यूटरची १३, क्लिनिकल इन्स्ट्रक्टरची दोन, कनिष्ठ लिपिकाची चार आणि नेत्रचिकित्सा अधिकाऱ्याचे एक पद रिक्त आहे. वरिष्ठ लिपिक, स्वच्छता निरीक्षक, मनोविकृती परिचारिका आदी पदांवरही रिक्तता असल्याची माहिती आहे.

१५ कोटी खर्च; तरी सुरक्षेचा प्रश्न कायम

गेल्या १३ वर्षांत जिल्हा रुग्णालयावर सुमारे १५ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती आहे. मात्र, जून २०२६ मध्ये रुग्णालयातील स्लॅब कोसळण्याची घटना घडली. त्यापूर्वी २०२४ मध्ये अलिबाग नगरपालिकेने धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्या होत्या. या यादीत जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचाही समावेश होता.

इमारतीची सुरक्षितता, विद्युत यंत्रणा आणि अग्निसुरक्षा या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाचे तातडीने सर्वंकष सुरक्षा परीक्षण करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

Raigad District Hospital Infrastructure Issues
Raigad flood : रायगडमधील वाढत्या महापुरांमुळे भूरचनेत बदल ?

प्रशासनाने माहिती जाहीर करावी

रुग्णालयाचे शेवटचे विद्युत ऑडिट कधी झाले? त्यामध्ये कोणत्या त्रुटी आढळल्या? त्या त्रुटींची पूर्तता करण्यात आली का? विद्युत यंत्रणेची सध्याची स्थिती काय आहे? तसेच ९९ रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासनाने आतापर्यंत कोणती कार्यवाही केली, याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी होत आहे.

दुर्घटना घडल्यानंतर जबाबदारी निश्चित करण्यापेक्षा दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयाचे विद्युत, अग्निसुरक्षा आणि इमारतीचे तातडीने सर्वंकष ऑडिट करून धोकादायक बाबी दूर कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news