

अलिबाग ः भपकेबाज लग्नसमारंभ, लाखोंचा खर्च आणि दीर्घ तयारीच्या गडबडीला आता तरुणाईने पर्याय शोधला आहे. “कमी खर्च, जास्त सोय” या तत्त्वावर आधारित नोंदणी विवाहाला दिवसेंदिवस वाढती पसंती मिळत आहे.रायगडात गेल्या वर्षभरात 361 दाम्पत्यांनी नोंदणी विवाह केले आहेत.
ऑनलाईन सुविधेमुळे ही प्रक्रिया अधिक सोपी आणि सुलभ झाली आहे. विशेष म्हणजे, आता घरबसल्या किंवा अगदी परदेशातूनही विवाहाची नोटीस देता येत असल्याने या पद्धतीकडे युवक-युवतींचा कल झपाट्याने वाढताना दिसत आहे.
पारंपरिक लग्न म्हटले की मंगल कार्यालय, जेवणावळी, वाजंत्री, महागडे कपडे, निमंत्रणपत्रिका आणि मिरवणुकाया सर्वांचा एकत्रित खर्च मोठा असतो. यामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक ताण येतो. मात्र, या सर्व खर्चिक गोष्टींना फाटा देत आजची तरुण पिढी “नो तामझाम” पद्धतीने साध्या आणि कायदेशीर विवाहाला प्राधान्य देत आहे. केवळ काहीशे रुपयांत, अगदी सुमारे 150 रुपयांच्या खर्चात विवाह नोंदवता येत असल्याने हा पर्याय अधिक आकर्षक ठरत आहे.
रायगड जिल्ह्यातील आकडेवारीही या बदलाची साक्ष देते. एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत तब्बल 361 जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला आहे. ही वाढती संख्या नोंदणी विवाहाचा स्वीकार वाढत असल्याचे स्पष्ट दर्शवते. सोपी, जलद आणि किफायतशीर प्रक्रिया असल्याने अनेकजण या पर्यायाकडे वळत आहेत.
नोंदणी विवाहातून मिळणारे कायदेशीर प्रमाणपत्र हे परदेश प्रवास, व्हिसा प्रक्रिया तसेच विविध शासकीय कामांसाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे व्यवहारिक दृष्टिकोनातूनही हा पर्याय अधिक फायदेशीर मानला जात आहे.
एकूणच, कमी खर्च, कमी वेळ आणि अधिक सोय यामुळे “साधं पण स्मार्ट” लग्न ही संकल्पना तरुणाईत रुजत असून, भविष्यात नोंदणी विवाहाचा ट्रेंड आणखी वेगाने वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ऑनलाईनमुळे फेऱ्या वाचल्या
विशेष विवाह कायदा 1954 अंतर्गत ही प्रक्रिया पार पडते. इच्छुक वधू-वरांनी विवाहाची नोटीस द्यावी लागते. त्यानंतर 30 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यावर, कोणताही आक्षेप न आल्यास तीन साक्षीदारांच्या उपस्थितीत विवाह नोंदवला जातो. आता ऑनलाईन नोटीस देण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने कार्यालयात जाण्याच्या फेऱ्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत.
“नोंदणी विवाह करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. नागरिकांना एक महिना अगोदर नोटीस द्यावी लागते, मात्र ऑनलाईन सुविधेमुळे ही प्रक्रिया अधिक सोयीस्कर झाली आहे. घरबसल्या ही सेवा उपलब्ध असल्याने नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.”
रविराज सुपेकर, दुय्यम निबंधक तथा विवाह अधिकारी