

Raigad Zilla Parishad Results
अलिबाग : रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाला (शेकाप) अलिबाग तालुक्यात मोठा धक्का बसला असून पक्षाचा पारंपरिक बालेकिल्ला निसटल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेच्या सातपैकी एकही जागा शेकापला जिंकता आली नाही. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून शेकापच्या ताब्यात असलेली अलिबाग तालुका पंचायत समितीची सत्ताही पक्षाला गमवावी लागली आहे.
अलिबाग तालुक्यातील सात जिल्हा परिषद जागांपैकी शिवसेनेने सहा जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले, तर एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली. शेकापने पाच जागांवर निवडणूक लढवली होती, तर दोन जागा महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सोडल्या होत्या. मात्र या सर्व जागांवर महाविकास आघाडीचा पराभव झाला असून शेकापला एकही जागा मिळवता आली नाही.
अलिबाग पंचायत समितीच्या १४ जागांपैकी केवळ एक जागा शेकापला मिळाली, तर एक जागा भाजपने जिंकली. उर्वरित १२ जागांवर विजय मिळवत शिवसेनेने पंचायत समितीवर एकहाती सत्ता स्थापन केली असून, शेकापच्या बालेकिल्ल्यावर विजय मिळवून शिवसेनेने राजकीय इतिहास घडवला आहे.
या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ. चित्रा पाटील तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ उपाध्यक्ष राजा ठाकूर यांना पराभवाचा सामना करावा लागला. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी या निकालातून आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.
जिल्हा परिषद शहापूर गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित नाईक विजयी झाले. तर शिवसेना शिंदे गटाकडून दिलीप भोईर (आवास), रसिका केणी (आंबेपूर), सचिन राऊळ (चौल), अनंत गोंधळी (कावीर), मानसी दळवी (थळ) आणि आदिती दळवी (चेंढर) हे सहा उमेदवार विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी व सून आदिती दळवी या दोघीही निवडून आल्याने जिल्हा परिषद निवडणुकीत सासू-सून एकत्र विजयी होण्याचा नवा इतिहास घडला आहे.