

पनवेल शहर : पनवेल परिसरातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी पनवेल-कर्जत उपनगरी रेल्वे मार्ग आणि जेएनपीटी-दिल्ली वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर या दोन महत्त्वाचे प्रकल्प मोठे क्रांतीकारक ठरणार आहेत. या दोन्ही प्रकल्पांमुळे प्रवासी व मालवाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होणार असून पनवेल नवक्रांतीच्या मार्गावर आहे.
पनवेल-कर्जत उपनगरी रेल्वे मार्ग अंदाजे 29.6 किमी लांबीचा असून पनवेल, चिखले, मोहापे, चौक आणि कर्जत अशी पाच स्थानके या मार्गावर विकसित केली जात आहेत. मुंबई रेल्वे विकास महामंडळ हा प्रकल्प राबवत असून अंदाजे 2 हजार 782 कोटींचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर पनवेल ते कर्जत प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी कमी होणार असून नवी मुंबई-पनवेल-रायगड या भागांतील प्रवास सुलभ होणार आहे.
दरम्यान, पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर अंतर्गत दिल्ली-एनसीआर ते जेएनपीटी या थेट मालवाहतूक मार्गाचे शेवटचे टप्पे पूर्णत्वाकडे जात आहेत. महाराष्ट्रातील वैतरणा ते जेएनपीटी हा 102.9 किमी लांबीचा टप्पा, तसेच कुंडेवहाळ बोगदा यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे. या फ्रेट कॉरिडोरमुळे मालवाहतूक वेगवान, सुरक्षित व कमी खर्चिक होणार असून जेएनपीटी, पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील लॉजिस्टिक्स व औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल. या दोन प्रकल्पांमुळे पनवेल रेल्वे स्थानकाचे स्वरूप पूर्णपणे बदलण्याची दाट शक्यता असून प्रवासी सुविधांचा विस्तार, तांत्रिक सुधारणांची वाढ आणि परिसरातील आर्थिक गती यामुळे पनवेल रेल्वे नेटवर्कमध्ये एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येत आहे.