

रायगड : अवकाळी पावसाने प्रथमतः खरीप हंगामातील भातशेतीतून तोंडाशी आलेला घास शेतकऱ्याकडून हिरावून घेतला. त्यानंतर रब्बी हंगामात भाजीपाला लागवड आणि कडधान्याची नासाडी केली आहे.
त्यातच आता ऐन गुलाबी थंडीत वातावरणीय बदलाचा फटका तूर, वालाच्या शेंगा उत्पादक शेतकऱ्यानाही बसल्याचे चित्र रायगड जिल्ह्यातून समोर येत आहे. कारण आतापर्यंत वालाच्या शेंगाचे उत्पादनच झालेले नाही. त्यामुळे शेंगा प्रेमींना ग्रामीण भागातील गावठी शेंगांसाठी वाट पहावी लागणार आहे.
तत्पूर्वी वालाच्या शेंगांची आवक मार्गशिष महिन्यापासून चांगल्या प्रमाणात होत होती. मात्र मागील एक दोन वर्षांपासून अवकाळी पाऊस अधून मधून हजेरी लावत असल्याने वालाच्या शेंगांचे उत्पादन लांबणीवर जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान सद्यस्थितीत रायगड मधील भाजीपाला बाजारातील उपलब्ध असलेल्या वालाच्या शेंगा ह्या अधिकतम बाहेरील जिल्ह्यातून येत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे ऐन थंडीत शेंगा प्रेमीच्या जिभेला हव्या असणाऱ्या ग्रामीणमधील गावठी शेंगांच्या पोपटीच्या माध्यमातून चवीचा आस्वाद घेता घेत नसून गावठी शेंगांची पारख असलेले ग्राहकांची हिरमोड होत असून असे ग्राहक बाजारात येणाऱ्या शेंगा खरेदी करण्यास कानाडोळा करत असून गावठी शेंगांच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून येत आहे.
भात कापणीनंतर लागवड केलेल्या वालाच्या शेंगांचे उत्पादन जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत मोठ्या प्रमाणात होत होते. आता भातशेतीतील लावणी आणि कापणीचा कालावधी लांबल्याने कडधान्ये, वालाच्या शेंगांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचेही गणित कोलमडले असून शेंगांच्या उत्पादनाची प्रतीक्षा करावी लागत असाल्याने शेतकयांना नुकसान सहन करावा लागत आहे.अलीकडील बदलत्या हवामान स्थितीचा पिकांवर परिणाम होत असून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात चालू हंगामात पावसाचा कालावधी अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणात लांबल्यामुळे जमिनीत जास्त काळ ओलावा टिकून राहिल.
कोकणातील रायगड जिल्हा म्हणजे चविष्ट, पारंपरिक आणि मातीच्या सुगंधाने भरलेली पाककृतींची परंपरा. याच परंपरेतील एक खास, लोकप्रिय आणि सगळ्यांच्या जिभेवर रेंगाळणारी डिश म्हणजे पोपटी. हा पदार्थ कोकणी संस्कृतीचा महत्त्वाचा भाग बनला आहे. परंपरेने ही डिश मातीच्या भांड्यात, शेणाच्या गोवऱ्यांच्या आणि लाकडाच्या आगीवर शिजवली जाते. फणसाच्या पानांनी झाकून, त्यावर भाज्या, वाटप, मांस किंवा चिकन टाकून वाफेवर शिजवलेली पोपटी अस्सल चव देऊन जाते.
कडधान्यांच्या लागवडीला अडचणी
साधारणतः भातकापणीनंतर शेतकरी वाल, पावटा, मूग, मटकी, हरभरा, तसेच भुईमूग अशा कडधान्यांची लागवड करतात, मात्र जमीन पूर्णपणे ओली असल्याने या लागवडीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. पाऊस लांबल्याने जमिनी ओल्या राहिल्या. यामुळे बी पेरणीसाठी अनेक दिवस योग्य स्थिती तयार झालेली नव्हती. यावर्षी कडधान्याची उशिरा पेरणी झाली.