

वागळे : ठाणे महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच महायुती व महाविकास आघाडी यांच्यामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुतीमध्ये भाजपा आणि शिंदे शिवसेना यामध्ये वरिष्ठ पातळीवर युती झालेली असताना जागा वाटपांचा वाढलेला तिढा पाहता युती टिकणार की तुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
राज्यातील नगरपरिषदांच्या निवडणुकीमध्ये भाजपास मिळालेले घवघवीत यश तसेच शिंदे शिवसेनेने मारलेली बाजी पाहता दोन्ही पक्ष आपल्याला महानगरपालिकेमध्ये जास्त प्रमाणात जागा मिळाव्यात, यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करत आहे. वरच्या पातळीवर जागावाटप चालू असताना हि युती टिकणार की तुटणार, याकडे लक्ष लागलेल्या संभाव्य उमेदवारांचा मानसिक ताणतणाव वाढत चाललेला आहे.
ठाणे महानगरपालिकेमध्ये एकूण 33 प्रभाग असून प्रत्येक प्रभागांमध्ये चार उमेदवारांना संधी मिळणार आहे. ठाणे महानगरपालिकेची एकूण लोकसंख्या 18 लाख 41 हजार 488 इतकी असून त्यामधील मतदारांची संख्या 16 लाख 49 हजार 867 इतकी आहे. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दि.15 जानेवारी 2025 रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असल्याने प्रशासन सज्ज झाले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले आहे. परंतु प्रशासनाची तयारी जरी झाली असली तरी राजकीय पक्षाचे उमेदवार सध्यातरी निवडणुकीसाठी सज्ज झालेले नसल्याचे चित्र युती व जागा वाटपाचा तिढा न सुटल्याने दिसून येत आहे.
शिंदेंचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना अशी ओळख असलेल्या ठाणे महानगरपालिकेमध्ये अनेक प्रभागांमध्ये चारही जागेवर शिवसेनेच्या जागा तर काही प्रभागामध्ये भाजपाच्या जागा निवडून आलेला आहेत. ठाणे महानगरपालिकेवर आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी शिंदे शिवसेनेने तर भाजपाने सुद्धा ठाणे महानगरपालिकेमध्ये पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वच प्रभागांमध्ये आपले उमेदवार देऊन निवडणूक लढवण्याची तयारी दाखवल्यामुळे स्थानिक निवडून आलेले नगरसेवक व अनेक वर्षापासून निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेले संभाव्य उमेदवार यांची संख्या वाढलेली आहे.
तसेच भाजपामध्ये अनेक राजकीय, सामाजिक व्यक्तीने प्रवेश करून उमेदवारीची मागणी केल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा स्थानिक भाजपाचे पूर्वीचे नगरसेवक व नवीन संभाव्य उमेदवार यांची सुद्धा संख्या वाढलेली आहे. भाजप व सेनेची युती झाल्यास प्रत्येक प्रभागांमध्ये कोणती जागा सेनेला व कोणती जागा भाजपला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्यातच ठाकरे शिवसेना व मनसेची युती झाल्यामुळे महाविकास आघाडीच्या हालचालींचा वेग वाढला आहे. त्यामुळे कोणत्या प्रभागांमध्ये कोणत्या पक्षाचा व कोणता उमेदवार दिल्यास तो विजय होईल, अशा पद्धतीने जागा देण्याचा कल दिसत आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जादूची कांडी काय जादु करणार याकडे लक्ष लागले आहे.
ना हरकत दाखल्यांची जमवाजमव
सर्वच पक्षाच्यावतीने कामाला लागा असे आदेश आलेले असल्यामुळे सर्वच संभाव्य उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लागणारे थकबाकी नसल्याचा दाखला, शौचालय वापर दाखला, ठेकेदार नसल्याचा दाखला, मतदार यादीचा उतारा, अग्निशमन विभाग, स्थानिक पोलीस स्टेशन, वाहतूक विभागाचे ना हारकत दाखल्यांची जमवाजमव करण्यासाठी महापालिका प्रभागामध्ये रांगाच रांगा लागलेल्या आहेत. तसेच अर्ज बाद होऊ नये, म्हणून दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी नामनिर्देशन अर्जाचे वाटप सुरू होतात अनेकांनी अर्ज घेऊन ते अर्ज भरण्याची तयारी सुद्धा सुरू केलेली आहे. सर्वच संभाव्य उमेदवारांनी आपल्या स्तरावर आपली तयारी केलेली असून तिकीट मिळेल या आशेने आपल्या प्रभागामध्ये गाठीभेटी, चौक सभा, सोसायटीमधील सभा तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे आकर्षक असे बॅनर बनवून आपल्या प्रचाराची सुरुवात सुद्धा केलेली आहे. एवढे सगळे करून अचानक उमेदवारी न मिळाल्यास पुढे थांबायचे की लढायचे, हा सुद्धा विचार हे उमेदवार करत आहेत.
काहींची अपक्ष लढायची तयारी
हे करत असताना अपक्ष लढायचे की वेगळ्या पक्षाचा दरवाजा ठोठवायचा याची सुद्धा मानसिक तयारी सुरु केलेली दिसत आहे. त्यामुळे जोपर्यंत जागा वाटपाचा तिढा मिटत नाही, प्रभाग निहाय उमेदवारांचे नावे पक्षाकडून अधिकृत होत नाही तोपर्यंत सगळ्याचा जीव टांगणीला लागलेला आहे. संभाव्य उमेदवारांची वाढलेली संख्या ही दोन्ही पक्षासाठी डोकेदुखी ठरणार असल्याचे जाणकारांकडून बोलले जात आहे. ठाणे महानगरपालिकेमध्ये पूर्वीचे स्थानिक नगरसेवक किती व नवीन चेहरे किती हे यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.