

वसई: गोव्याच्या खालोखाल वसईत होणाऱ्या नाताळचा उत्साह आज वसई विरारच्या रस्त्यांवर दिसून आला. सकाळी चर्चेस मधून नटून थटून आलेल्या ख्रिस्ती बांधवांचे थवेच्या थवे आनंदाच्या हिंदोळ्यावर वावरताना दिसून आले. ख्रिस्ती बांधवांचा पवित्र आणि आनंदाचा सण असलेल्या नाताळला (ख्रिसमस) वसई-विरारमध्ये मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे.
प्रभू येशूच्या जन्मोत्सवाचे स्वागत करण्यासाठी अवघी वसई नगरी सजली असून, चर्च, घरे आणि सार्वजनिक चौकांमध्ये करण्यात आलेल्या मनमोहक विद्युत रोषणाईने आसमंत उजळून निघाला आहे. हा उत्सव पुढे आठवडाभर अधिक उत्साहाने रंगत जाऊन, नववर्षाच्या स्वागतापर्यंत चालणार आहे. यात ख्रिस्ती बांधीवांसह सर्वधर्मीय बांधव सहभागी होताना दिसत आहेत.
वसईच्या ऐतिहासिक परंपरेनुसार, नाताळचा सण येथे केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित न राहता एक सामाजिक उत्सव बनला आहे. बुधवारी मध्यरात्रीपासूनच विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थना (मिस्सा) आणि येशू जन्माचा सोहळा पार पडला. यावेळी चर्चमध्ये उभारलेले भव्य नाताळ गोठे आणि येशू जन्मावर आधारित देखावे भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.वसईतील मुख्य रस्ते, झाडे आणि ऐतिहासिक वास्तूंवर केलेली रोषणाई पाहण्यासाठी पर्यटकांनीही वसईत गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.
कार्निव्हल आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
वसईच्या पश्चिम पट्ट्यात पारंपारिक वेषभूषेतील मिरवणुका आणि ख्रिसमस कार्निव्हलला सुरुवात झाली आहे. यामध्ये स्थानिक तरुण मंडळींकडून कॅरल गायन आणि वाद्यांच्या तालावर प्रभू येशूचा संदेश घराघरात पोहोचवला जात आहे. अनेक ठिकाणी सामाजिक संदेश देणारे देखावे आणि सांस्कृतिक उपक्रमही राबवण्यात येत आहेत.
बाजारपेठेत लगबग
नाताळनिमित्त बाजारपेठाही फुलून गेल्या आहेत. विविध प्रकारचे केक, पेस्ट्री आणि पारंपारिक कुसवार (नाताळची मिठाई) खरेदीसाठी नागरिकांनी दुकानांत गर्दी केली आहे. ख्रिसमस ट्री, सांताक्लॉजच्या टोप्या, चांदण्या आणि भेटवस्तूंच्या दुकानांमध्ये मोठी उलाढाल होत असल्याचे चित्र दिसत आहे.
काल मध्यरात्री प्रभू येशूचा जन्म सोहळा सर्व चर्चेस मधून साजरा करण्यात आला. त्यावेळी आणि आजही चर्चेस मधून विशेष प्रार्थना करण्यात आल्या. आज शहरात चोहीकडे उत्साहाचे वातावरण असून, सर्वत्र सांताक्लॉजचे लहान-मोठे आणि देशी-परदेशी बनावटीचे रंगीबिरंगी बाहुले, ख्रिसमस-ट्री, जिंगल बेल, कागदी व प्लास्टिकच्या स्टार सोबतच लाकडी स्टार (चांदण्या), विविध स्वरूपातील चॉकलेट बॅगा, नाताळासाठी खास तयार केलेले म्युझिकल लाईट, टेबल क्लॉथ, ग्रिटींग कार्डस, डोअर-मॅट, वेलकम बॅनर, लाइटिंग-ट्री, स्नो इफेक्ट, ख्रिसमस ट्री, सिगिंग अँड डान्सिंग कॅप, रंगीबेरंगी इकोफ्रेडली कॅडल्स व स्टार्स अशा शेकडो नाताळाच्या चीजवस्तूंनी शहर बहरले आहे.
प्रेसीला जोसेफ डिसोजा, भाविक, रमेदी.