

पेण शहर: खड्डा चुकवताना पेण-खोपोली मार्गावर बुधवारी भोगावती नदीत रिक्षा कोसळून झालेल्या अपघातात एक ठार,तर एक जण गंभीर जखमी झाला. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आणखी एका निष्पाप जीवाला जीव गमवावा लागल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
या रस्त्यावर मोठा खड्डा पडलेला होता. रिक्षा चालकाने तो खड्डा टाळण्याचा प्रयत्न करत वाहन डाव्या बाजूस घेतले. मात्र तेथे कोणत्याही प्रकारचा संरक्षक कठडा किंवा सुरक्षा व्यवस्था नसल्याने रिक्षा थेट भोगावती नदीच्या पात्रात कोसळली. या भीषण अपघातात एकनाथ किसन किंजवडे (वय 53, रा. कामार्ली, ता. पेण) यांचा जागीच मृत्यू झाला. तर भूषण पाटील (रा. कराडे, पो. रसायनी) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पेण येथील म्हात्रे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला आहे. संबंधित ठिकाणी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असून रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. नागरिकांनी वारंवार राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या पेण शाखेकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही, असा गंभीर आरोप करण्यात येत आहे. “प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळेच आज एका व्यक्तीचा जीव गेला,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.
अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने बाहेर काढण्यात आले आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, एका व्यक्तीचा जीव वाचवता आला नाही. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.