

विक्रम बाबर
पनवेल: पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान मतदान प्रक्रियेतील एका महत्त्वाच्या मुद्द्याने कामोठे परिसरात चर्चा निर्माण झाली आहे. कामोठे येथील बूथ क्रमांक १३ आणि केंद्र क्रमांक ३ मधील इंडो-स्कॉट शाळेतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावून बाहेर आलेल्या सुनील शिरीषकर यांनी मतदानानंतर बोटावर लावली जाणारी शाई साध्या पाण्याने व टिशू पेपरने पुसली जात असल्याचा दावा केला असून, यासंदर्भात व्हिडिओ शेअर केला आहे.
कामोठे येथील मतदार सुनील शिरीषकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदान करून बाहेर आल्यानंतर सोशल मीडियावर मतदानाच्या शाईबाबत दाखवण्यात आलेला व्हिडिओ पाहून त्यांनी खात्री करण्यासाठी स्वतः प्रयोग केला. साध्या पाण्याचा वापर करून आणि टिशू पेपरने पुसल्यावर मतदानाची शाई निघून जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. विशेष म्हणजे पूर्वी ही शाई किमान तीन ते चार दिवस तरी जात नव्हती, मात्र यावेळी ती सहज निघून जात असल्याने त्यांनी ती बाब गंभीर असल्याचे म्हटले आहे.
शिरीषकर यांनी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते की, मतदानानंतर काही वेळातच शाई पुसली जाऊ शकते. ही बाब केवळ वैयक्तिक अनुभवापुरती मर्यादित न ठेवता त्यांनी सार्वजनिक केली असून, यामुळे दुबार मतदान होण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता यासाठी मतदानाची शाई हा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. अशा परिस्थितीत शाई सहज निघून जाणे हे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरू शकते.
या प्रकरणाची राज्य निवडणूक आयोग तसेच संबंधित निवडणूक यंत्रणांनी तातडीने दखल घ्यावी आणि वापरण्यात येणाऱ्या शाईच्या गुणवत्तेबाबत चौकशी करावी, अशी मागणी सुनील शिरीषकर यांनी केली आहे. मतदानासारख्या पवित्र लोकशाही प्रक्रियेत कोणताही संशय निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक ती कार्यवाही करून नागरिकांचा विश्वास कायम ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.