

पनवेल ः पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेवक पदाच्या 78 जागांकरिता आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झाली असून, अर्ज विकत घेण्यासाठी नव्या इच्छुक उमेदवारांनी आज महापालिका हद्दीतील विविध वॉर्ड कार्यालयांमध्ये गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.निवडणुकीचे बिगुल वाजले असले तरी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख राजकीय आघाड्यांचे उमेदवार अद्याप जाहीर न झाल्याने आज अर्ज घेण्यासाठी माजी नगरसेवक कुठेही दिसून आले नाहीत. त्यामुळे पहिल्याच दिवशी अर्ज विक्री प्रक्रियेत नवख्या आणि अपक्ष इच्छुकांचीच अधिक उपस्थिती दिसून आली.
पोलीस बंदोबस्तासह विशेष खबरदारी
पनवेल महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेचा आज पहिलाच दिवस असल्याने पनवेल महानगरपालिकेकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. गर्दी होऊ नये, तसेच कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस बंदोबस्तासह विशेष खबरदारी घेण्यात आली होती.
महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार यादीला वेळ लागणार
दरम्यान, महायुती होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवार युतीच्या निर्णयाची वाट पाहत असून, दुसरीकडे महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमधील इच्छुक उमेदवारही अद्याप युतीबाबतच्या अंतिम निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. दोघांच्या अंतिम उमेदवार याद्या जाहिर होण्यास वेळ लागणार आहेत. याच कारणामुळे माजी नगरसेवकांनी अर्ज घेण्यापासून सध्या तरी दूर राहणे पसंत केल्याचे चित्र आज दिसून आले.
आगामी काही दिवसांत युतीबाबत स्पष्टता येण्याची शक्यता असून, त्यानंतर अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग येईल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे. तोपर्यंत पनवेल महापालिका निवडणुकीची राजकीय रंगत दिवसेंदिवस वाढत जाणार, हे मात्र निश्चित आहे.पनवेल महानगरपालिका हद्दीत एकूण 78 जागांसाठी ही निवडणूक होत असून, त्यामुळे संपूर्ण शहराचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
शांततापूर्ण,पारदर्शक निवडणूक पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज
निवडणूक जाहीर होताच शहरात राजकीय हालचालींना वेग आला असून विविध पक्ष व अपक्ष उमेदवार तयारीला लागले आहेत. दरम्यान, निवडणूक अधिकारी व कर्मचारी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी कामाला लागले असून, मतदान केंद्रांची पाहणी, कर्मचाऱ्यांची नेमणूक तसेच आवश्यक तयारी सुरू करण्यात आली आहे.आचारसंहिता लागू झाल्याने शहरात प्रचारावर प्रशासनाची कडक नजर राहणार असून शांततापूर्ण व पारदर्शक निवडणूक पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.