

नेरळ : कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. कर्जत भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात कर्जत - खालापूर विधानसभा निवडणूक संर्पकप्रमुख किरण ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी संघटनात्मक मजबुती तसेच युतीबाबत कार्यकर्त्यांच्या भावना खुलेआम पणे मांडण्यात आल्या.
त्या बैठकीत कर्जत तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी बोलताना कर्जत - खालापूर विधानसभा निवडणूक संर्पकप्रमुख प्रमुख किरण ठाकरे यांनी परिवर्तन घडवायचे असेल तर एकला चलोरेचा नारा दिला आहे.
या आढावा बैठकीस कर्जत - रवालापूर विधानसभा संपर्क प्रमुख किरण ठाकरे, कर्जत मंडळ अध्यक्ष राजेश लाड, कर्जत ग्रामीण मंडळ अध्यक्ष दिनेश रसाळ, राजेश चौधरी, ऋषिकेश जोशी, संभाजी गरूड, महिला मोर्चा महासचिव महाराष्ट्र भाजपा मृणाल खेडकर, संदीप म्हसकर, विजय हजारे, अक्षय लाड, तसेच विविध बुथ अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीमध्ये कर्जत ग्रामीण भागाचे मंडळ अध्यक्ष दिनेश रसाळ यांनी मात्र आक्रमक भूमिका घेत कार्यकर्त्यांना संबोधित केले बैठकीदरम्यान महायुती बाबत कार्यकर्त्यांनाच थेट विचारणा केली असता, अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत युती करण्यासाठी हात वर केले. मात्र शिवसेना शिंदे गटा सोबत जाण्यासाठी एकाही पदाधिकारी व कार्यकर्त्याने आपला हात वर न करता शिवसेना शिंदे गटासोबतच्या युतीला आपली नापसंती दर्शवली आहे.
यामुळे कर्जत ग्रामीण तसेच कर्जत शहरी भागात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची शिवसेना शिंदे गटाविषयी उघडपणे नाराजी असल्याचे मात्र स्पष्ट झाले आहे. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना पहाता हीच वेळ आहे, आता भाकरी फिरवण्याची असल्याने सुतवाच हे कर्जत ग्रामीण मंडळ अध्यक्ष दिनेश रसाळ यांनी करत, या बैठकीतील शिवसेना शिंदे गटासोबत युतीस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नाराजी दर्शवणारा विडियो हा भाजपच्या वरिष्ठ नेतेमंडळींकडे पाठवा असे वक्तव्य देखील दिनेश रसाळ यांनी केले आहे.