

पनवेल : विक्रम बाबर
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पनवेल तालुक्यात भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता मिळवत वर्चस्व प्रस्थापित केले असले तरी अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी दिलेल्या जोरदार लढतीने राजकीय समीकरणांकडे लक्ष वेधले आहे.
भाजपच्या मजबूत संघटनात्मक ताकदीसमोर अपक्ष उमेदवारांनी टक्कर देत काही ठिकाणी विजय जवळपास खेचून आणल्याचे चित्र पाहायला मिळाले. गव्हाण जिल्हा परिषद गणात भाजपच्या निकिता निलेश खारकर यांनी 15,127 मते मिळवत विजय मिळवला. मात्र याच गणात अपक्ष उमेदवार सुनंदा अमर म्हात्रे यांनी तब्बल 13,278 मते मिळवत भाजप उमेदवाराला कडवी झुंज दिली.
अवघ्या 1,849 मतांच्या फरकाने खारकर यांनी विजय मिळवला असला तरी सुनंदा म्हात्रे यांच्या दमदार लढतीने संपूर्ण गणात चुरशीचे वातावरण निर्माण केले होते. स्थानिक स्तरावर अपक्ष उमेदवारांनी दाखवलेली ही ताकद भाजपसाठीही विचार करायला लावणारी ठरली.
वाहाळ पंचायत समिती गणातही अशीच चुरस पाहायला मिळाली. भाजपचे वितेश त्रिंबक म्हात्रे यांनी 8,907 मते मिळवत विजय मिळवला. मात्र अपक्ष उमेदवार रुपेश राम मोहिते यांनी 7,765 मते मिळवत त्यांना कठीण लढत दिली. केवळ 1,142 मतांच्या फरकाने भाजप उमेदवार विजयी झाले. मोहिते यांच्या लढतीमुळे भाजप उमेदवारांना शेवटपर्यंत सावध राहावे लागले होते. गव्हाण पंचायत समिती गणातही अपक्ष उमेदवारांनी आपले अस्तित्व ठळकपणे दाखवून दिले.
भाजपच्या जिज्ञासा किशोर कोळी यांनी 6,988 मते मिळवत विजय मिळवला. मात्र अपक्ष उमेदवार सविता अविनाश कोळी यांनी 3,747 मते मिळवत भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले होते. अखेरीस 3,241 मतांच्या फरकाने भाजप उमेदवार विजयी झाले असले तरी या लढतीत अपक्ष उमेदवारांची उपस्थिती प्रभावी ठरली.