Pali Water Supply: पालीत गढूळ पाणीपुरवठा, निर्जंतुकीकरण ड्रॉप्सही गायब; पावसाळ्याचे नियोजन कागदावरच

जलजन्य आजारांचा धोका; नगरपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा संताप
Pali Water Supply
Pali Water SupplyPudhari
Published on
Updated on

शरद निकुंभ

रायगड: सुधागडमध्ये संततधार पावसामुळे पाली परिसरातील नदी-नाले दुथडी भरून वाहत होते. त्यामुळे रस्त्यांवर चिखल, कचरा आणि गाळाचे साम्राज्य पसरले. अशा गंभीर परिस्थितीत पाली शहराला जॅकवेलमधून होणारा पाणीपुरवठा गढूळ होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मात्र, याही परिस्थितीत नगरपंचायतीकडे पाणी निर्जंतुकीकरणासाठी लागणारे ड्रॉप्सच उपलब्ध नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

Pali Water Supply
Wavhehaveli Dam Waterfalls: वावेहवेली धरण झाले पर्यटकांनी फुल्‍ल; धबधब्यांच्‍या दिशेने पर्यटकांची पावले

पावसाळा सुरू होऊन दहा दिवस उलटले, तरी नगरपंचायतीकडे निर्जंतुकीकरणाचे ड्रॉप्स नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. ड्रॉप्सची मागणी करण्यासाठी नगरपंचायतीत जाणाऱ्या नागरिकांना "थोड्या दिवसांत येतील," असे ठरलेले उत्तर दिले जात आहे. मात्र, हे 'थोडे दिवस' नेमके किती, याचे उत्तर प्रशासनाकडे नाही.

दरवर्षी पावसाळ्यात गढूळ पाणीपुरवठा होणार, नदीला पूर येणार आणि जलजन्य आजारांचा धोका वाढणार, हे माहीत असूनही आवश्यक औषधे, निर्जंतुकीकरणाचे ड्रॉप्स व इतर साहित्याचा साठा पावसाळ्यापूर्वीच का करण्यात आला नाही, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

Pali Water Supply
Matheran Stray Cattle: माथेरानमध्ये आलेल्या पर्यटकांवर मोकाट गुरांचा हल्ला

नगरपंचायतीने संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा अंदाज घेऊन किमान महिनाभर आधी नियोजन करणे अपेक्षित असताना, प्रत्यक्ष संकट ओढवल्यानंतरच प्रशासनाला जाग येत असल्याची टीका होत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विषयातही अशी उदासीनता का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

गढूळ पाणीपुरवठ्यामुळे पोटाचे विकार, अतिसार, कावीळसारख्या जलजन्य आजारांचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नगरपंचायतीने तातडीने निर्जंतुकीकरणाचे ड्रॉप्स उपलब्ध करून पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

पाली शहरात पाणी गाळण्यासाठी स्वतंत्र फिल्ट्रेशन व्यवस्था नसल्याने नागरिकांना पाणी शुद्ध करूनच वापरावे लागते. यासाठी पूर्वीच्या पाली ग्रुप ग्रामपंचायतीपासून ते गेल्या चार वर्षांपासून कार्यरत असलेल्या नगरपंचायतीमार्फत दरवर्षी क्लोरोवॅट या पाणी शुद्धीकरण औषधाचे मोफत वाटप केले जात होते. मात्र, जुलै महिना सुरू होऊनही यंदा अद्याप नागरिकांना हे औषध उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. नगरपंचायतीने याबाबत तातडीने उपाययोजना करून क्लोरोवॅटचे वाटप सुरू करावे अन्यथा अशुद्ध पाण्यामुळे जलजन्य व साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे.

- विदेश आचार्य, शहरप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

नगरपंचायतीकडून क्लोरोवॅट या पाणी शुद्धीकरण औषधाची खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून त्याची अधिकृत ऑर्डर देण्यात आलेली आहे. पुरवठादाराकडून औषध उपलब्ध होताच साधारण आठ ते दहा दिवसांच्या आत शहरातील सर्व नागरिकांना क्लोरोवॅटचे मोफत वाटप करण्यात येईल. अतिवृष्टीमुळे अंबा नदीला पूर आल्याने पाणी गढूळ होत असले तरी पाणीपुरवठा सुरक्षित राहावा यासाठी नगरपंचायत आवश्यक त्या उपाययोजना करत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता पिण्याचे पाणी उकळून किंवा शुद्ध करूनच वापरावे. क्लोरोवॅट उपलब्ध होताच प्रत्येक प्रभागात त्याचे नियोजनबद्ध पद्धतीने वितरण करण्यात येईल. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे ही नगरपंचायतीची प्राथमिकता असून याबाबत कोणतीही हलगर्जीपणा केला जाणार नाही.

- सुलतान बेनसेकर, उपनगराध्यक्ष, पाली नगरपंचायत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news