

कळंबोली : दीपक घोसाळकर
रायगड जिल्ह्यातील अष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी बल्लाळेश्वराच्या तीर्थस्थानाने जगप्रसिद्ध असलेल्या पल्ली पुरात म्हणजेच पालीमध्ये सर्व धर्मीय जातपंथांच्या भक्तांच्या हाकेला धावून येणारी अन् त्यांची विघ्न दूर करणारी श्री मरीमाता आईचे देवस्थान सर्वांनाच हृदय स्थानी आहे. सर्वच भक्त मरी माता आईच्या चरणी लीन होऊन जीवनात सुख समृद्धी आनंद मिळण्यासाठी देवीकडे साकडे घालीत असतात.
मरी माता देवी ही सर्वांना भरभरून आशीर्वाद देत असल्याने देवी वरचा श्रद्धेचा अन भक्तीचा फेरा तितकाच घट्ट होत जात आहे .या देवस्थानचे देखरेख व सेवा येथील सोनार समाजातील बांधव मोठ्या भक्ती भावाने गेले 250 वर्षापासून करीत आहेत .येथील समाजसेवक संजय घोसाळकर या मरीमाता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.या देवस्थान तर्फे मंदिरामध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल वर्षभर सुरू असते. मंदिराच्या सभागृहाचे काम देवस्थान ट्रस्टने हाती घेतले असून भक्तांकडून भरभरून हातभार लावण्याचे आव्हानही ट्रस्टमार्फत करण्यात आले आहे.
श्री मरी माता देवीची स्थापना 1856 मध्ये म्हणजे सुमारे 250 वर्षांपूर्वी करण्यात आल्याचे पूर्वजांकडून सांगण्यात आल्यानुसार समजते. गाव रचना ज्यावेळी करण्यात आली त्याकाळी प्रत्येक समाजाच्या संख्येनुसार या पालीमध्ये विविध समाजाचे बांधव विसावले. त्यानुसार पालीची रचना ही प्रत्येक समाजाच्या आळीनुसार झाली आहे. आणि त्यांनी आपल्या हृदय स्थानी असणार्या देवांची स्थापना ही त्यावेळी केली आहे. जस जसे देवीचे भक्त वाढू लागले तसा मंदिराची देखभाल करण्यासाठी 1955 मध्ये शासनाच्या नियमानुसार देवस्थानची ट्रस्टमध्ये नोंदणी करण्यात आली. त्याकाळी ट्रस्टी म्हणून मोहरे, माहीमकर, पोवळे, पोतदार, म्हशीळकर या कुटुंबातील सदस्यांनी मोठा सहभाग घेऊन ट्रस्टची उभारणी चांगल्या पद्धतीने केली असल्याचे ट्रस्टचे माजी अध्यक्ष आणि सुरेश पोतदार यांनी सांगितले आहे.
देवस्थानचा कारभार हा नंतर कै. प्रभाकर नारायण वेदक यांनी आपल्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळून चांगल्या पद्धतीत कार्यरत करून समाज बांधवांना संघटित केले. त्यानंतर देवस्थानचा कारभार सुरेश पोतदार यांनी हाती घेऊन देवस्थानला उर्जित अवस्था प्राप्त करून दिली व समाजातील तरुणांनाही देवस्थानच्या कामांमध्ये सहभाग घेऊन देवस्थानच्या कामाची धुरा ही तरुण वर्गाकडे दीली. देवीचे वर्षभरात असणारे विविध सण सांस्कृतिक कार्यक्रम याबाबत सर्व सविस्तर माहिती या समाजातील ज्येष्ठ नागरिकांनी तरुण पिढीकडे वारसा हक्कने सुपूर्द केले.
सद्यस्थितीत समाजातील पालीतील सोनार समाजातील सर्व तरुण वर्ग हा मोठ्या हिरीरीने मरीमाता देवीची चांगल्या पद्धतीने सेवा करून पूर्वजांनी घालून दिलेल्या रीतीरीवाज व धार्मिक असणारे संस्कार हे याथा सांग पार पडत असून यामध्ये अन्य समाजातील नागरिकांनाही तितक्याच मोठ्या श्रद्धेने सामावूनही घेतले जात आहेत .मरीमाता देवीच्या मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या धुमधडाक्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल करून पार पडला जातो. त्याच बरोबर होळी, गोकुळाष्टमीचाही सण मोठ्या भक्ती भावाने पालीतील सर्व समाजातील नागरिकांना बरोबर घेऊन चांगल्या रीतीने पार पाडले जातात. माघी गणपतीची उत्सवातील आलेली पालखी ही मरीमाता देवस्थानच्या समोर थांबून देवीला मोठा मान दीला जातो. तसेच देवळात देवस्थानच्या मंडळीकडून भजनही केले जाते.
सोनार समाजाकडून देवीची स्थापना
पालीचे भौगोलिक व सामाजिक स्वरूप जात धर्म पंथ असे सर्व समावेशक व एकात्मतेचे आहे. त्याकाळी सोनार समाजाकडून या मरीमाता देवीची स्थापना करण्यात आली. प्रथम देवीचे छोटे मंदिर व आजूबाजूला मोकळा परिसर होता. या देवीची पूजाअर्चा व देखभाल व्हावी याकरता पालीतील न्याती बंधू मोडक या महिला भगिनी या देवीच्या निसिम भक्त होत्या. त्यांनी त्याकाळी देवीसाठी आपली बलाप येथील शेत जमीन व पालीतील राहते घराची जागा ही दान केली. त्यातून मिळणार्या वर्षभराच्या उत्पन्नातून देवीचा देखभाल खर्च केला जायचा.