

खानिवडे : विश्वनाथ कुडू
विरार शहरा लगत असलेल्या उंच डोंगरावरिल जीवधन गडावर जीवदानी आईचं मंदिर स्थित आहे .कधी काळी या शहराचं नाव एकविरा होतं, असं म्हटलं जातं. त्या काळी या मंदिराला एकविरा देवी या नावानेही ओळखलं जातं होतं. मोगल आणि पोर्तुगीजांच्या आक्रमणांत या मंदिराला इजा पोहोचवली गेली होती. त्यावेळी काही स्थानिक लोक या डोंगरावर देवीच्या दर्शनाला येत. त्यांच्याच आस्थेमुळे देवीची महती पुढील पिढीत स्रवत गेली. देवीचं मंदिर वैतरणा नदीच्या तटावर पर्वतराजींच्या कुशीत वसलेलं आहे. वर्तमान काळात भाविकांत आई जीवदानी देवी म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील 18 शक्तीपिठांपैकीही हे एक स्थान असल्याचं सांगितलं जातं.
आई जीवदानीचं मंदिर 17 व्या शतकात बनवलं गेल्याचं म्हटलं जातं. अन्य मंदिरांप्रमाणेच या मंदिरांतही जलकुंडांची निर्मिती केली होती; मात्र पूर्वीच्या तुलनेत या मंदिरांत अनेक बदल झालेले आहेत. यातील अनेक जलकुंड नामशेष झाले आहेत. मंदिरापर्यंत जाण्यासाठी भाविकांना अंदाजे 1300 पायर्या चढून जावं लागतं. आई जीवदानीचं मंदिर पूर्वी खूपच लहान होते. पायर्या चढणीच्या होत्या. मात्र वेळेनुसार यात अनेक बदल करून भाविकांच्या सोयीनुसार त्यांची निर्मिती केली गेली आहे.
1946 ते 56 या काळात बारकीबाय नावाची भक्त रोज गडावर जाऊन नेमाने देवीची पूजा करीत असे. त्यानंतर 1956 मध्ये देवीच्या भक्तांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. 23 फेब्रुवारी 1956 मध्ये जीवदानी मंदिर ट्रस्टची स्थापना झाली. आजही भाविकांत आई जीवदानीविषयी प्रचंड श्रद्धा आहे. त्यामुळे नवसाला पावणारी देवी म्हणूनही या मंदिराची ख्याती आहे.
जीवनदानी म्हणजे जीवनदायीनी! ऐतिहासिकदृष्ट्या हे मंदिर आत्यंतिक प्राचीन आहे. या मंदिराची निर्मिती पांडवांनी वनवासात असताना केल्याची आख्यायिकाही सांगितली जाते. येथील एका गुंफेत पाच पांडवांनी देवीची स्थापना केली होती. हे स्थान पांडव डोंगरी सदृश बनवलं गेलं. हे स्थान योगी, संत आणि ऋषी यांचं निवासस्थान होतं.
आजही अनेक योगीपुरुष आणि ऋषी देवदर्शनादरम्यान मंदिर परिसरात निवासाला असतात.डोंगरावर चढताना दुतर्फा हिरवीगार वनराई आहे. मंदिरात जाण्यासाठी पायर्या शिवाय पाचपायरी हा जुना मार्ग असून येथून भाविक पायवाटेने जातात. विविध नवस करणे आणि ते फेडण्यासाठी भाविक आजही या मार्गाची निवड करतात.