Pali dumping ground pollution : पालीतील डम्पिंग ग्राऊंड प्रदूषणाच्या विळख्यात

धुमसणारा कचरा, दुर्गंधीने नागरिक त्रस्त; न.पं.कडून बेलिंग-श्रेडिंग प्रकल्पाची तयारी; वैज्ञानिक कचरा व्यवस्थापनाची आशा
Pali dumping ground pollution issue
पालीतील डम्पिंग ग्राऊंड प्रदूषणाच्या विळख्यात pudhari photo
Published on
Updated on

पाली ः शरद निकुंभ

पाली न.पं.च्या हद्दीतील टेंबी परिसरातील डम्पिंग ग्राऊंड सध्या गंभीर प्रदूषणाचा केंद्रबिंदू बनला असून येथील धुसमसणारा कचरा, पसरलेली दुर्गंधी आणि विषारी धुरामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या चार वर्षांपासून कचऱ्याचे ढिगारे वाढत चालले असून ओला व सुका कचरा एकत्र टाकला जात असल्याने परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. मात्र या पार्श्वभूमीवर न.पं. प्रशासनाने आधुनिक यंत्रणेद्वारे वैज्ञानिक कचरा व्यवस्थापन सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्याने भविष्यात परिस्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

पाली न.पं.च्या वतीने सुमारे एक एकर जागा डम्पिंग ग्राऊंड म्हणून वापरण्यात येत आहे. न.पं. हद्दीतून दररोज जमा होणारा कचरा याच ठिकाणी आणून टाकला जातो. मात्र येथे कचऱ्याचे शास्त्रीय वर्गीकरण होत नसल्याने सर्व प्रकारचा कचरा एकत्र साचत आहे. वाढत्या कचऱ्यामुळे मोठमोठे ढिगारे तयार झाले असून त्यातून मिथेन वायू निर्माण होत आहे. वायूमुळे कचऱ्याला आग लागून तो अनेक दिवस धुसमसत राहतो. त्यामुळे परिसरात सतत धुराचे लोट पसरलेले दिसतात.

Pali dumping ground pollution issue
Pimpri Chinchwad RMC Plant Pollution: पिंपरी-चिंचवडमध्ये आरएमसी प्लांटचा कहर; सिमेंटच्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका

डम्पिंग ग्राऊंडला कोणतीही संरक्षक कंपाऊंड वॉल नसल्याने कचरा चारही बाजूंनी पसरत आहे. परिसरातील गाय, बैल, म्हशी, कुत्रे तसेच इतर भटकी जनावरे अन्नाच्या शोधात येथे येत असतात. प्लास्टिकमध्ये टाकलेले उरलेले अन्न खाताना ही जनावरे प्लास्टिकही गिळतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे नागरिक सांगतात. काही गुरांच्या मृत्यूच्या घटनांमुळेही नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

ओला व सुका कचरा एकत्र टाकला जात असल्याने दुर्गंधीचे प्रमाणही वाढले आहे. ओला कचरा सडल्याने परिसरात माशा व डासांची संख्या वाढत असून रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात या सडलेल्या कचऱ्यातून निघणारे दूषित पाणी परिसरात पसरण्याची शक्यता असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नागरिकांच्या मते, केवळ कचरा टाकणे आणि वेळोवेळी तो ढकलण्यापलीकडे कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने हा प्रश्न वर्षानुवर्षे कायम आहे.

Pali dumping ground pollution issue
Panvel Monsoon Plan: पनवेल मनपाला लागले पावसाळ्याचे वेध

दरम्यान, नागरिकांनी न.पं.कडून केवळ आश्वासने न देता प्रत्यक्षात तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. डम्पिंग ग्राऊंडला संरक्षक भिंत उभारणे, कचऱ्याला लागणाऱ्या आगीवर नियंत्रण ठेवणे, ओला-सुक्या कचऱ्याचे काटेकोर वर्गीकरण करणे आणि वैज्ञानिक पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे.

पाली शहराच्या वाढत्या लोकसंख्येसोबत कचऱ्याचे प्रमाणही वाढत असताना आधुनिक व शाश्वत कचरा व्यवस्थापनाची गरज अधिक तीव्र झाली आहे. न.पं.ने सुरू केलेल्या नव्या उपाययोजना प्रत्यक्षात प्रभावीपणे राबवल्या गेल्यास भविष्यात पाली शहराला प्रदूषणमुक्त आणि अधिक स्वच्छ वातावरण मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

  • मात्र या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी न.पं. प्रशासनाने आता आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत उपाययोजना सुरू केल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने पाली न.पं.ला बेलिंग मशीन आणि श्रेडिंग मशीन उपलब्ध करून दिली आहेत. या दोन्ही यंत्रणा बसविण्यात आल्या असून त्यासाठी आवश्यक असलेले वीज कनेक्शन देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

बेलिंग मशीनच्या सहाय्याने प्लास्टिक कचरा वेगळा करून त्याचे गठ्ठे तयार केले जाणार आहेत. त्यामुळे प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. तसेच श्रेडिंग मशीनद्वारे ओला कचरा बारीक करून त्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यात येणार आहे. यामुळे ओल्या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लागून दुर्गंधी आणि धुराचे प्रमाण कमी होईल. भविष्यात प्रदूषण, दुर्गंधी व नागरिकांना होणारा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होईल.

अमोल बायकर, पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता नगरपंचायत पाली

पाली न.पं. हद्दीत सध्या चार कचरा गाड्यांद्वारे नियमित कचरा संकलन केले जात आहे. हे काम शक्ती कन्स्ट्रक्शन, पनवेल यांच्याकडे देण्यात आले असून सध्या कचरा उचलण्याचे काम समाधानकारक सुरू आहे. आगामी काळात कचरा संकलन अधिक प्रभावी पद्धतीने करण्यात येणार असून गाड्यांमध्येच ओला व सुका कचरा वेगळा घेण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे कचरा डम्पिंग ग्राऊंडमध्ये पोहोचण्यापूर्वीच त्याचे प्राथमिक वर्गीकरण होईल आणि पुढील प्रक्रिया अधिक सुलभ होईल.

वैभव ओव्हाळ, स्वच्छता निरीक्षक, नगरपंचायत पाली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news