

संतोष उतेकर
सुधागड: अनेक वर्षापासून पालीकर फिल्टर पाण्याच्या प्रतीक्षेत पुढारी व लोकनेते यांनी जनतेला आश्वासने दिली, परंतु आजवर फिल्टर पाण्याचा प्रश्न अध्यापि तसाच राहिला आहे, परंतु आज पर्यंत ती आश्वासने अपुरीच सुधागड तालुक्यासह खालापूर, रोहा व पेण आदी तालुक्यातून वाहणारी व अनेकांची जीवनवाहिनी असलेल्या अंबा नदीतून पाली शहराला पाणी पुरवठा होतो.
सुधागड तालुक्यातील अंबा नदी शेजारील गावांतील लोक व प्राणी देखील याच पाण्याचा पिण्यासाठी व वापरासाठी वापर करतात.
मात्र सध्या अंबानदीचे पाणी शेवाळ व केमिकलचा तवंगमुळे प्रदूषित झाले आहे. पाण्यावर शेवाळ व रसायनामुळे हिरवट, पिवळा व लालसर तवंग आला आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिक, भाविक व प्राण्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पावसाळ्यानंतर अनेक ठिकाणी बंधारे कार्यान्वीत करुन अंबा नदिचे पाणी अडविले जाते. त्यामुळे या साठलेल्या पाण्यात सध्या मोठ्या प्रमाणात हिरवळ तयार झाली आहे. तसेच नदीतून वाहून आलेले प्रदूषित व सांडपाणी पुढे वाहून न जाता येथेच साठून राहते.
रासायनिक कपंनीमधुन टाकऊ रसायन हे थेट आंबा नदीत सोडले जाते. तसेच रसायन व सांडपाण्याबरोबरच कचरा आणि घाण देखिल साठते. नदीवर महिला कपडे व भांडी धुतात. तसेच नदित टाकलेले निर्माल्य कुजल्याने देखिल पाणी खराब होते. परिणामी ते अधिक दुषित झाले आहे.
पालीकरांसह भाविकांना दूषित पाणी पुरवठा
अंबा नदीच्या पाण्यावर कोणतीही शुद्धीकरण व क्लोरीनेशनची प्रक्रिया न करता थेट पालीकरांना पुरविले जाते. अशा प्रकारे कित्येक वर्षे पालिकरांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. पाली हे अष्टविनायक क्षेत्र आहे. येथे रोज हजारो भाविक येत असतात. पालीची स्थायी लोकसंख्या देखील पंधरा हजारहून अधिक आहे.
अशा परिस्थितीत भाविक व नागरिकांना नाईलाजाने हे गढूळ व खराब पाणी प्यावे व वापरावे लागत आहे. आत्तापर्यंत येथील नळांतून चक्क जिवंत साप, खुबे, शिंपले, मासे आणि किडे अनेकवेळा बाहेर आले आहेत. गाळ, चिखल आणि शेवाळ येणे हे तर नेहमीचेच आहे. शिवाय पाणीपुरवठा देखील अनियमित होतो.
अंबानदीचे पाणी लॅबला परीक्षणासाठी पाठवले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची त्वरित सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आम्ही करत आहोत. सोमवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाला यासंबधीचे पत्र दिले आहे. नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे.
- पराग मेहता, नगराध्यक्ष पाली
उन्हामुळे नदीच्या पाण्यावर शेवाळ तयार झाले आहे. दूषित घटक व केमिकलचा देखील समावेश आहे. त्यामुळे शेवाळ अधिक जलद वाढत असावी. मात्र प्रशासनाने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
कपिल पाटील, संघर्ष समिती अध्यक्ष, पाली