

पालघर : पाकिस्ताच्या समुद्री हद्दीत मासेमारी करताना प्रवेश केल्यामुळे नल नारायण गुजरात राज्यातील ओखा-पोरबंदर येथील 3 ट्रॉलरसह काही भारतीय खलाशांना पाकिस्तानने ताब्यात घेतले आहे. यामध्ये पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथील नामदेव बाळकृष्ण मेहेर यांचा समावेश आहे. नामदेव मेहेर यांच्या सुटकेसाठी सरकारने प्रयत्न करावे व त्यांची सुटका करावी, अशी मागणी मेहेर कुटुंबीयांनी केली आहे.
पालघर जिल्ह्यातील सातपाटी, डहाणू, तलासरी तालुक्यातील अनेक मच्छीमार खलाशी चांगला पगार, मोबदला मिळवण्यासाठी गुजरात राज्यातील ओखा, पोरबंदर, वेरावळ भागातील बोटीवर खलाशी कामगार म्हणून कामावर जात असतात. नामदेव बाळकृष्ण मेहेर (वय 65) हे सातपाटी येथील मच्छीमार खलाशी गुजरात राज्यातील ओखा-पोरबंदर येथील नल नारायण या जयंतीभाई राठोड यांच्या ट्रॉलरवर काम करण्यासाठी गेले होते.
खोल मासेमारी करत असताना नल नारायण ही ट्रॉलर बोटीने चुकून पाकिस्तानच्या सागरी हद्दीत प्रवेश केला. पाकिस्तानच्या सागरी हद्दीत प्रवेश केल्याने पाकिस्तानच्या मेरीटाईम सिक्युरिटी एजन्सीकडून नल नारायण ट्रॉलर व त्यावर असलेल्या मच्छीमार खलाशांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबतची माहिती गुरुवारी नामदेव मेहेर यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीला पाकिस्तानने अटक केल्याच्या या घटनेमुळे मेहेर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून ते अत्यंत दडपणाखाली आहेत. नामदेव मेहेर यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारने प्रयत्न करून त्यांची सुटका करावी, अशी मागणी त्यांची पत्नी मुलगा व कुटुंबीयांनी केली आहे. या घटनेने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.