

राजकुमार भगत
उरण : उरण तालुक्यातील हिंद कंटेनर टर्मिनल येथे एका टायर कंटेनरमध्ये एक परदेशी जातीचा साप आढळून आला आहे. या सापाची ओळख ‘कॉर्न स्नेक’ अशी झाली असून हा उत्तर अमेरिकन खंडातील एक विदेशी प्रजातीचा साप आहे. हा साप कंटेनरमधून या परिसरात आला आहे. भारतात मात्र हा आढळत नसल्याने या दुर्मीळ पाहुण्याबाबत कुतूहल वाढले आहे.
अमेरिकेतून आयात केलेल्या टायरच्या कंटेनरमध्ये जेएनपीए बंदरातून उरण परिसरात आला होता. कंटेनर तपासणीदरम्यान हा साप कर्मचार्यांच्या नजरेस पडला होता. एक वेगळ्या नारंगी रंगाचा, आकर्षक पट्टेरी साप दिसल्याने व्यवस्थापनातर्फे त्वरित बचाव कार्यासाठी फ्रेंडस् ऑफ नेचर फॉन संस्थेच्या स्वप्नील म्हात्रे या स्वयंसेवकास या बाबत माहिती दिली. या नंतर फ्रेंडस् ऑफ नेचर (फॉन) च्या जयेश गायकवाड या बचावकर्त्याने घटनास्थळी जाऊन साप सुरक्षितरीत्या पकडून त्याची काळजी घेतली. पुढील कारवाईसाठी वनविभागाकडे हा साप सुपूर्द करण्यात येणार आहे. त्याला पुन्हा अमेरिकेत पाठविण्यात येणार असल्याची शक्यता आहे.