

अलिबाग : सुवर्णा दिवेकर
अलिबाग-रोहा मार्गावरील वढाव येथील पूल सोमवारी कोसळल्याची दुर्घटना सोमवारी सायंकाळी घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र सदर दुर्घटना ही प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे घडल्याचे दिसून येते. काही महिन्यांपूर्वी या मार्गावरील धोकादायक पुलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते, यामध्ये मार्गावरील ५ पूल धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले. मात्र यावेळी संबंधित दुर्घटनाग्रस्त वढाव येथील पूलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यातच आले नसल्याची बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे मागील सहा वर्षांपासून या मार्गाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असूनही अद्यापपर्यंत काम पूर्ण झाले नसल्याचे दिसून येत आहे.
अलिबाग रोहा मार्गाची दुरावस्था झाली आहे. यामुळे या मार्गासाठी २०१९ रोजी १७७कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. काँक्रिटीकरण, डांबरीकरण आणि रुंदीकरण करून रस्ता होणार होता. त्यात नवीन पूल बांधण्याचे काम होते. मात्र सदर काम रखडले. यांनतर ठेकेदार बदलून काम पुन्ह हाती घेण्यात आले. मात्र नवीन ठेकेदाराला आपण केलेल्या कामांची बिले वेळेत न मिळाल्याने सध्या काम बंद असल्याचे दिसून येते.
सद्यस्थितीत अलिबाग ते खानावपर्यंत डांबरीकरण तसेच खानाव ते गेल कंपनीपर्यंत कॉंक्रिटीकरण केले. अद्यापही या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. काँक्रिटीकरण अपूर्ण स्थितीत आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवाशांना खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागत आहे.
क्षमता नसताना या मार्गावरून अवजड वाहने या रस्त्यावरून धावत आहेत. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने सोमवारी सायंकाळी वढाव ते खानाव रस्त्यावरील साकव मधोमध तुटल्याची घटना घडली.
या मार्गावरून केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या गेल कंपनीची अवजड वाहतूक सुरू आहे. या मार्गावरून अवजड वाहतूक करू नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कंपनी व्यवस्थापनासोबत पत्रव्यवहार केला आहे. मात्र कंपनीची अवजड वाहतून अद्याप सुरु आहे. सध्या गेल कंपनीकडून हायड्रोजन पॉलीप्रोपलींग प्रकल्पाची उभारणी करण्याचे काम जोमाने सुरू आहे.
या प्रकल्पासाठी मोठमोठी यंत्र या मार्गावरून नेण्यात येतात. एकीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग कंपनीसोबत अवजड वाहतूक करू नये यासाठी पत्रव्यवहार करीत असताना कंपनीची यंत्रे नेण्यासाठी या मार्गावर जिल्हाधिकारी यांनी काही महिन्यांपूर्वी सदर मार्गावर इतर वाहनांना दोन वेळा तात्पुरती वाहतूक बंदी आदेश जारी केले होते. याबाबत गेल कंपनीचे अधिकारी जितीन सक्सेना यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन न उचलल्याने संपर्क होऊ शकला नाही.
काही दिवसांपूर्वी या मार्गावरील धोकादायक पुलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते, यामध्ये रामराज पुल, सुडकोली येथील २ पूल, तसेच इतर आणखी २ पूल धोकादायक असल्याचे आढळून आले. मात्र यावेळी संबंधित दुर्घटनाग्रस्त वढाव येथील पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यातच आले नव्हते. यामुळे या धोकादायक पुलाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
वढाव पूल दुरुस्ती करण्याबाबत येथील ग्रामस्थांनी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले आहे. या पूलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणीसुद्धा ग्रामस्थांनी केली होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याची चर्चा आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील महाड, पोलादपूर तालुक्यांना जोडणारा ८८ वर्ष जुना पूल सावित्री नदीला आलेल्या पुरात बाहुन गेल्याची घटना २ ऑगस्ट २०१६ रोजी घडली होती. या दुर्घटनेत दोन एस.टी. बससोबत एक चारचाकी वाहन नदीच्या प्रवाहात वाहून गेले होते, यामधील २८ जणांचे मृतदेह सापडले तर ९ जणांचे मृतदेहांचा शोध लागला नाही. यानंतर जिल्ह्यातील सर्वच जुन्या पूलांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मात्र अद्यापही जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलेले नसल्याचे दिसून येते.