

पनवेल ः विक्रम बाबर
पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत यंदा राजकीय समीकरणांइतकेच ‘नोटा’ म्हणजेच या पर्यायाने वेध घेतले. 78 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत तब्बल 245 उमेदवार रिंगणात होते. एकूण मतदारसंख्या 5 लाख 54 हजार 578 इतकी असताना केवळ 56 टक्के मतदान झाले. म्हणजेच 3 लाख 8 हजार 708 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या मतदानात ‘नोटा’ला तब्बल 43 हजार 211 मते मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
लोकशाही व्यवस्थेत ‘नोटा’ हा पर्याय केवळ एक तांत्रिक सुविधा नसून मतदारांच्या असंतोषाचा थेट आवाज मानला जातो. पनवेलसारख्या वेगाने विकसित होत असलेल्या शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात मतदारांनी कोणत्याही उमेदवाराला न पसंत करता ‘नोटा’ची निवड करणे, ही बाब राजकीय पक्षांसाठी आत्मपरीक्षणाची घंटा ठरली आहे.
निवडणूक लढवणाऱ्या 245 उमेदवारांपैकी एकाही उमेदवारावर विश्वास न टाकता 43 हजारांहून अधिक नागरिकांनी ‘नोटा’ दाबणे, हे आकडेवारीत लहान वाटले तरी त्यामागचा संदेश अतिशय गंभीर आहे. या निवडणुकीत प्रमुख पक्षांमध्ये तीव्र लढत दिसून आली. अनेक प्रभागांत विद्यमान नगरसेवक, नातेवाईकांतील राजकीय संघर्ष, तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांची चुरस पाहायला मिळाली.
नोटामुळे अनेकांचा जय, पराजय
विशेष म्हणजे, ‘नोटा’ला मिळालेली 43 हजार 211 मते ही अनेक उमेदवारांना मिळालेल्या मतांपेक्षा अधिक आहेत. काही प्रभागांमध्ये विजय-पराभवाचा फरक अत्यंत कमी असताना ‘नोटा’ची संख्या निर्णायक ठरू शकली असती, असा सूरही उमटत आहे. जरी ‘नोटा’मुळे थेट कोणाचा पराभव किंवा निवड रद्द होत नसली, तरी लोकशाहीतील हा निषेधाचा मार्ग राजकीय पक्षांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो.
नोटांना मिळालेली मते खालीलप्रमाणे
प्रभाग 1,2 आणि 3 - 5,215
प्रभाग 4,5 आणि 6, - 8,596
प्रभाग 7,8,9 आणि 10 -8,808
प्रभाग 11,12 आणि 13 - 6,769
प्रभाग 14,15 आणि 16- 8,106
प्रभाग 17,18,19 आणि 20 - 5,717