

मुंबई : कांदिवली-बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम करण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या मार्गावरील तब्बल 240 लोकल फेऱ्या शुक्रवार आणि शनिवारी रदृ करण्यात आल्या. विकेंडमुळे चाकरमान्यांना याचा फार फटका बसला नसला तरी परेच्या ठिकठिकाणच्या स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली होती. आता रविवारी 18 जानेवारीलाही या लोकलफेऱ्या बंदच राहणार असल्याचे पश्चिम रेल्वेने आधीच जाहीर केले आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी 16 जानेवारीला 120 लोकल फेऱ्या रदृ करण्यात आल्या. शनिवारीही 120 फेऱ्या धावल्या नाहीत. आता रविवारीही याच संख्येने फेऱ्या रदृ कराव्या लागतील.
कांदिवली आणि बोरिवली दरम्यानच्या सहाव्या मार्गिकेचे बांधकाम करण्यासाठी पश्चिम रेल्वेने 30 दिवसांचा पायाभूत सुविधांचा कार्यक्रम हाती घेतला आहे. गेल्या 20 डिसेंबरला तो सुरू झाला. त्यासाठी टप्प्याटप्प्याने मेगाब्लॉक घेतला जात आहे. या कामचा फटका लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही बसत असून काही गाड्या उशिरा धावत आहेत. त्यात मुंबई सेंट्रल - अहमदाबाद आणि वांद्रे-गोरखपुर एक्स्प्रेसचा समावेश आहे.