

कांदिवली : जानेवारीच्या पहिल्या पंढरवड्यात दिवस उशीरा उजाडत असल्याने सकाळी 7 पर्यंत काळोख असतो. मार्गांवरील पथदिवे अदानी व्यवस्थापनाकडून उजाडण्यापूर्वीच बंद केले जातात. कांदिवलीत पश्चिम परिसरात 6 शाळा,2 महाविद्यालये आणि लॉ कॉलेज असल्याने, पहाटे शेकडो विद्यार्थी तसेच कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या प्रवाशांना मार्गावर काळोख असल्याने वाहने दृष्टीस पडत नाहीत. यामुळे वाहन चालकांसह, प्रवासी व विद्यार्थ्यांमध्ये अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.
कांदिवली पश्चिमेला स्वामी विवेकानंद मार्गावर बालभारती शाळा व एसटी बसथांबा आहे. शांतीलाल मोदी मार्गावर प्रकाश कॉलेज, महापालिका शाळा आणि मथुरादास मार्गामधील छेद मार्गावर के. ई. एस. कॉलेज तसेच लॉ कॉलेज, स्वामी विवेकानंद शाळा व पुढे धनामल शाळा आहे.
यामुळे शाळा, कॉलेजकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तसेच इच्छित बस व रेल्वे पकडण्यासाठी रेल्वे स्थानाकाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे.यामुळे सर्वच मुख्य मार्गांवर पहाटे गर्दी असते. जानेवारी महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात थंडी वाढली असून दिवस उशीरा उजाडत आहे.
या सर्वच मार्गांवर अदानी इलेक्ट्रिक सिटी व्यवस्थापनाचे पथदिवे आहेत. मुख्य मार्गांवरील पथदिवे अदानी व्यवस्थापनाकडून सकाळी दिवस उजाडण्यापूर्वीच बंद केले जातात. यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना काळोखातून, वाहनांच्या अंधुक प्रकाशातून वाटचाल करावी लागते. सकाळी धावपळ असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. अदानी व्यवस्थापनाने याबाबत दखल घेऊन दिवस उजाडेपर्यंत पथदिवे सुरू ठेवावेत. यामुळे विद्यार्थी, चाकरमानी, पेपरवाले, दूधवाले यांना मोठा दिलासा मिळेल.