

खांदा कॉलनी : एनएच-४ ते जेएनपीटी महामार्गावर कलंबोलीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर साडेसातच्या सुमारास कंटेनरचा अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर रस्त्यावर आडवा झाल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. सकाळच्या गर्दीच्या वेळी हा अपघात झाल्याने कामावर जाणारे नागरिक आणि वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. कंटेनर रस्त्यावर आडवा झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
या महामार्गावरून कलंबोली, पनवेल तसेच जेएनपीटीच्या दिशेने दररोज मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. गेल्या काही दिवसांत या परिसरात दोन ते तीन अपघात घडल्याची माहिती समोर येत असल्याने या मार्गावर अपघातांची मालिका सुरू झाली आहे का, असा प्रश्न वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे.
अवजड वाहनांचा वेग, वाहनांवरील नियंत्रण आणि वाहतुकीचे नियोजन याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत अवजड वाहनांचा अपघात झाल्यास संपूर्ण वाहतूक व्यवस्थेवर त्याचा परिणाम होत आहे.
आणखी किती अपघात झाल्यानंतर महामार्ग प्रशासन जागे होणार? अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी, अपघातप्रवण ठिकाणी सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी तसेच वाहतूक नियोजन सुधारण्यासाठी वाहतूक पोलीस आणि संबंधित महामार्ग प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.