

मुंबई : नायगाव रेल्वे स्थानकात २० वर्षीय तरुणी सोफिया खानला लोकलखाली ढकलून तिचा हात गमावण्यास कारणीभूत ठरलेल्या जितेंद्र गिरजप्पा हिरमुखे (५३) याच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. या प्रकरणात त्याच्याविरुद्ध दाखल असलेल्या पहिल्या गुन्ह्याव्यतिरिक्त आता खुनाच्या प्रयत्नाचे एक कलम लावण्यात आले असून, या नव्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याला पुन्हा अटक करण्यात येणार आहे.
त्यासाठी न्यायालयाची परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती भाईंदर रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत वंशा तुंबडा यांनी शुक्रवारी दिली. आरोपी जितेंद्र हिरमुखे याला मुखाचा कर्करोग असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्याच्यावर यापूर्वी कोणत्याही गुन्ह्याची नोंद नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
मूळचा धाराशिव जिल्ह्यातील असलेला जितेंद्र सध्या वाकीपाडा, नायगाव पूर्व, पालघर येथे वास्तव्यास आहे. या घटनेत तरुणी लोकल आणि फलाटाच्या मधील जागेत पडली. तिचा डावा हात रेल्वेच्या चाकाखाली आल्याने तिला गंभीर दुखापत झाली.
उपचारादरम्यान डॉक्टरांना तिचा हात कापावा लागला. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन आरोपीला ९ नोव्हेंबर रोजी अटक केली. या गुन्ह्यात न्यायालयाने त्याला कोठडी सुनावली.
सीसीटीव्ही तपासातून आरोपीचा माग, प्रत्यक्षदर्शीचे जबाब महत्त्वाचे
आरोपीने घटनेनंतर चेहऱ्यावर रुमाल बांधून घटनास्थळावरून पळ काढला होता. भाईंदर रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने नायगाव स्थानकासह परिसरातील विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपी लाल रंगाचा शर्ट घालून स्थानकातून बाहेर जातानाची माहिती समोर आली. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्याचा माग काढून ९ नोव्हेंबरला वाकीपाडा, नायगाव पूर्व येथील घरातून अटक केली. घटनेच्या वेळी फलाटावर अनेक प्रवासी उपस्थित होते. दोघांमधील वाद वाढल्यानंतर प्रवासीही घटनास्थळी जमले होते. त्यामुळे प्रत्यक्षदर्शीचे जबाब तपासात महत्त्वाचे ठरणार आहेत.