

राजकुमार भगत
उरण: नेरुळ येथील एनआरआय जलक्षेत्रात यंदाच्या हंगामात मोठ्या संख्येने दाखल झालेल्या स्थलांतरित गुलाबी फ्लेमिंगो (रोहित) पक्ष्यांसमोर आता नव्या मानवनिर्मित संकटाचे सावट उभे राहिले आहे. या फ्लेमिंगोंच्या अधिवास परिसरात आणि थेट त्यांच्या डोक्यावरून बेकायदेशीरपणे ड्रोन उडवण्याचे प्रमाण कमालीचे वाढले असून, यामुळे हे फ्लेमिंगो प्रचंड तणावाखाली आले आहेत.
सोशल मीडियावर सध्या अशा ड्रोन-चित्रित व्हिडिओंना पूर आला असून, कमी उंचीवरून फ्लेमिंगोंचे अगदी जवळून चित्रीकरण केले जात असल्याचे समोर आल्याने पर्यावरणप्रेमींनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
पर्यावरणप्रेमींच्या मते, यंदा हवामान बदलामुळे फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन नेहमीपेक्षा उशिरा झाले आहे. त्यातच डीपीएस फ्लेमिंगो लेक आणि टीएस चाणक्य जलक्षेत्र हे पक्ष्यांसाठी अधिकाधिक प्रतिकूल बनल्याने सध्या हे पक्षी प्रामुख्याने एनआरआय जलक्षेत्रात एकवटले आहेत.
मात्र, याच ठिकाणी काही अतिउत्साही छायाचित्रकार मनोरंजनासाठी आणि केवळ सोशल मीडियावरील व्ह्यूजसाठी फ्लेमिंगोंच्या वरून ड्रोन उडवत आहेत, जे या पक्ष्यांसाठी अत्यंत घातक ठरत आहे.
नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले की, सोशल मीडियावर फ्लेमिंगो ‘नाचत’ असल्याचे आणि घाबरून उडताना दिसणारे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत.
यावरून मनोरंजनासाठी पक्ष्यांना मुद्दाम घाबरवले जात असल्याचे स्पष्ट होते. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत संरक्षित अधिवासांमध्ये वन्यजीवांना कोणताही त्रास देणे पूर्णपणे प्रतिबंधित असून संवेदनशील वन्यजीव क्षेत्रांमध्ये ड्रोन चालवण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे वन विभाग आणि मँग्रोव्ह सेलने आता केवळ कागदी घोडे न नाचवता अधिक कठोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
पर्यावरणप्रेमींनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, खाद्य शोधताना किंवा विश्रांती घेताना फ्लेमिंगो पक्ष्यांना ड्रोनमुळे गंभीर मानसिक आणि शारीरिक त्रास होऊ शकतो. ड्रोनमधून निर्माण होणारा कर्कश आवाज आणि अचानक होणारी हवाई हालचाल पक्ष्यांमध्ये घबराट निर्माण करते. त्यामुळे त्यांना विनाकारण उड्डाण करावे लागते आणि त्यांची महत्त्वाची ऊर्जा विनाकारण खर्च होते.
अनेकदा या घाबरलेल्या अवस्थेत उडताना ड्रोनच्या तीक्ष्ण पात्यांमुळे पक्षी गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडण्याचाही मोठा धोका आहे. यापूर्वी टीएस चाणक्य परिसरातील फ्लेमिंगो अधिवासाजवळ एका वेब सिरीजच्या चित्रीकरणावेळी अशाच प्रकारे ड्रोन वापरण्यात आला होता, ज्याची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत करण्यात आली होती. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची दखल घेत गृह विभागाला सतर्क केले होते.
दुसरीकडे, वन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, एनआरआय जलक्षेत्रात येणाऱ्या पर्यटकांच्या पिशव्यांची तपासणी करण्यासाठी आणि बेकायदेशीर ड्रोनवर लक्ष ठेवण्यासाठी वनरक्षक तैनात करण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात एक ड्रोन जप्त करून संबंधित चालकाला कडक इशारा देऊन सोडण्यात आले आहे. प्रशासकीय डोळेझाकीमुळे जलक्षेत्रावर गुप्तपणे ड्रोन उडवण्याचे प्रकार पहाटेच्या आणि संध्याकाळच्या वेळी अजूनही सर्रास सुरूच असल्याचे त्यांनी सांगितले.
जागतिक स्तरावर फ्लेमिंगो पक्ष्यांचा समावेश आययूसीएनच्या ‘निअर थ्रेटन्ड’ म्हणजेच धोक्याच्या उंबरठ्यावर असलेल्या प्रजातींच्या यादीत करण्यात आला आहे. अशा अत्यंत संवेदनशील स्थलांतरित पक्ष्यांचे संरक्षण करणे आणि त्यांना तणावाखाली न ढकलणे ही आपली मानवी जबाबदारी आहे.
- ज्योती नाडकर्णी, पक्षीनिरीक्षक, संचालिका स्वर्णसृष्टी हॅबिटॅट रिस्टोरर फाउंडेशन