

अलिबाग: रायगड जिल्ह्यातील ताजी मासळीला जास्त भाव असतो तसा सुक्या मासळीलाही असतो. पावसाला सुरू झाला की सुकटीचा हंगाम सुरू होतो. सुकटीची चवच न्यारी असते. पावसाळ्यात मासळी मिळत नसल्याने सुका जवळा खाण्यावर अधिक भर दिला जातो.
त्यामुळे स्थानिक बाजारासह महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात तसेच कर्नाटक, गोवा राज्यात सुकटीला प्रचंड मागणी वाढली आहे. आतापर्यंत सुमारे तीन हजार टन सुकटीची निर्यात झाल्याची माहिती समोर आली आहे. गतवर्षीच्या तुलनेने यावर्षी दरही चांगले मिळाले, असे मच्छिमारांकडून सांगण्यात आले आहे.
समुद्राला पावसाळ्यात उधाण येते. त्यामुळे मासेमारीला या कालावधीत बंदी असते. जिल्ह्यात जूनपासून मासेमारी दोन महिने बंद असणार आहे. त्यामुळे मासळी खाणाऱ्यांना मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे पावसाळ्या पुर्वी सुकी मासळी विकत घेऊन ती ठेवण्यावर भर दिला जात आहे. वाकटी, बोंबीलसह सुका जवळा खरेदी करून त्याची साठवण करून ठेवली जात आहे.
सुका जवळा अर्थात सुकटीचा हंगाम मार्चपासून सुरु झाला आहे. जाळ्यात सापडलेला जवळा सुकवून तो साफ करून बाजारात विक्री करण्यात आली आहे. जवळा मोठ्या प्रमाणात जाळ्यात सापडला. त्यामुळे मच्छिमारांना जवळ्याची लॉटरीच लागली.
हा जवळा स्थानिक बाजारासह वेगवेळ्या जिल्हयातील व राज्यातील बाजारपेठेत पाठविण्यात आला आहे. यंदा जवळ्याच्या विक्रीतून मच्छिमारांना चांगला फायदा झाला आहे. गतवर्षी दहा किलो जवळ्या मागे 730 - 800 रुपये मिळाले होते.
यंदा मात्र दहा किलो जवळ्यामागे दीड ते दोन हजार रुपये मिळाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघाचे माजी अध्यक्ष विजय गिदी यांनी दिली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग व मुरूड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात जवळ्याची निर्यात करण्यात आली आहे.
अपेक्षेपेक्षा चांगले दर यंदा जवळा विक्रीतून मिळाले आहेत. यावर्षी रायगड जिल्ह्यातील अनेक भागासह महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर, सातारा, सांगली, नगर या जिल्ह्यात तसेच कर्नाटक व गोवा या राज्यात सुक्या जवळ्याला मागणी वाढली. आतापर्यंत सुमारे तीन हजार टन जवळ्याची निर्यात झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
त्यामुळे यंदा मच्छिमारांना जवळा विक्रीतून चांगला फायदा झाल्याचे गिदी यांनी सांगितले. ओला जवळा बोटीतून काढणे. तो सिमेंट कॉक्रीटच्या खळीमध्ये सुकविण्यासाठी पसरवणे. त्यानंतर तो साफ करणे. ओला जवळा सुका झाल्यावर तो भरून ठेवणे अशा अनेक प्रकारची कामे गेल्या महिन्यभरापासून सुुरू आहे.
असंख्य महिलांना या माध्यमातून रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे. पाचशे ते सातशे रुपये मजुरीवर हे काम मिळत आहे. काही ठिकाणी दहा ते पंधरा तर काही ठिकाणी पाच ते सात महिला काम करतात. त्यामुळे या दोन ते तीन महिन्याच्या कालावधीत शेकडो हातांना काम मिळत असल्याचे चित्र आहे.
शेणाची खळी कालबाह्य
मार्च महिन्यापासून जवळ्याचा हंगाम सुरु होतो. त्यामुळे पुर्वी जवळा सुकविण्यासाठी शेणाची खळी तयार केली जात होती. शेण, माती आणणे, जमीन बुळबळीत करणे अशी अनेक कामे केली जात होती. दरवर्षी हा खर्च केला जात होता. हा खर्च टाळण्यासाठी आता सिमेंट काँक्रीटद्वारे खळी तयार करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे आता शेणाची खळी कालबाह्य झाल्याचे चित्र आहे.
मच्छिमारांना मदतीचा हात द्यावा
जूनपासून दोन महिने मासेमारीवर बंदी आहे. या बंदीमुळे हजारो बोटी किनाऱ्यावर असणार आहे. त्याचा मोठा आर्थिक फटका मच्छिमारांना बसणार आहे. या कालावधीत रोजगाराचे साधन नसल्याने आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने या कालावधीत मच्छिमारांना आर्थिक बळ देण्यासाठी प्रति कुटूंबाला उदरनिर्वाहासाठी दहा ते वीस हजार रुपये आर्थिक मदत करावी अशी मागणी महाराष्ठ्र राज्य मच्छिमार संघ, मुंबईचे माजी अध्यक्ष विजय गिदी यांनी केली आहे.
यंदा जवळा मोठया प्रमाणात जाळ्यात सापडला आहे. गतवर्षी पेक्षा यंदा जवळ्याला भाव ही चांगले मिळाले, काही ठिकाणी शंभर, दीडशे तर काही ठिकाणी दोनशे रुपये किलोच्या भावाने सुका जवळा विकण्यात आला. रायगडसह, कोल्हापूर, सातारा,सांगली या जिल्ह्यात तसेच कर्नाटक, गोवा या राज्यात सूमारे तीन हजार टन जवळ्याची निर्यात झाली आहे.
- विजय गिदी, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघ, मुंबई