Stray Dog Attack Karjat: कर्जतमध्ये भटक्या श्वानांचा बकऱ्यांवर हल्ला; 28 बकऱ्या मृत्युमुखी

सहा जखमी; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
Stray Dog Attack Karjat
Stray Dog Attack KarjatPudhari
Published on
Updated on

नेरळ: कर्जत तालुक्यातील डिकसळ येथील भटक्या श्वानांच्या हल्ल्यातील एका लहान चिमुकल्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना, त्यामध्येच कर्जत शहरातील लहान मुलांसह नागरिकांवर भटक्या श्वानांचा हल्ल्याची घटना ताजी असताना, आता तालुक्यातील धुळेवाडी परिसरात भटक्या श्वानांच्या जोडीने बकऱ्यांच्या कळपावर भीषण हल्ला चढवत अक्षरशः कहर केल्याची घटना घडली आहे.

या हल्ल्यात तब्बल 28 बकऱ्यांचा मृत्यू झाला असून सहा बकऱ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी बकऱ्यांच्या जगण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याची माहिती शेतकरी तानाजी धुळे यांनी दिली आहे. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

शेतीला जोड व्यवसाय म्हणून तानाजी धुळे यांनी मोठ्या मेहनतीने शेळीपालन व्यवसाय सुरू केला होता. यासाठी त्यांनी राजस्थानमधील अजमेर येथून 35 बकऱ्या व बोकड खरेदी करून आणले होते. गावाबाहेरील शेतात पत्र्याच्या सुरक्षित शेडमध्ये त्यांचे संगोपन सुरू होते.

Stray Dog Attack Karjat
Dried Fish Market: रायगडमधील चवदार सुकटीला गोव्यासह कर्नाटकात मोठी मागणी

मात्र 26 मे रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अचानक बकऱ्यांचा आक्रोश आणि कुत्र्यांच्या भुंकण्याचा मोठा आवाज सुरू झाला. परिसरातील एका इमारतीतील सुरक्षा रक्षकांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ शेतकरी तानाजी धुळे यांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर ते तातडीने शेडकडे धावत पोहोचले. मात्र तोपर्यंत भटक्या श्वानांच्या जोडीने बकऱ्यांवर हल्ला करून अक्षरशः रक्तरंजित कहर केला होता.

Stray Dog Attack Karjat
‌Muktabai Hospital News: ‘बेड नाही‌’ म्हणत गंभीर रुग्णाला दाखल करण्यास नकार! मुक्ताबाई रुग्णालयातील प्रकार

शेतकरी घटनास्थळी पोहोचताच हल्ला करणाऱ्या भटक्या श्वानांनी तेथून पळ काढला. विशेष म्हणजे सहा फूट उंचीचे सुरक्षित कुंपण असलेल्या शेडमध्ये प्रवेश करून या श्वानांनी बकऱ्यांवर हल्ला चढवला होता. पहाटेच्या अंधारात अनेक बकऱ्या मृत अवस्थेत पडलेल्या होत्या, तर काही गंभीर जखमी अवस्थेत तडफडत होत्या. हे भयावह दृश्य पाहून धुळे कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे.

या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका रात्रीत संपूर्ण व्यवसाय उद्ध्वस्त झाल्याने धुळे कुटुंब हवालदिल झाले असून प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, तसेच भटक्या श्वानांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news