Matheran Mini Train: माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा धावणार? १५ ते २० ऑक्टोबरदरम्यान सेवा सुरू होण्याची शक्यता

पावसाळ्यात झालेले भूस्खलन; रेल्वेमार्गावरील मलबा हटवून दुरुस्ती पूर्ण; तांत्रिक तपासणीनंतर मिळणार हिरवा कंदील
Matheran Toy Train
Matheran Toy TrainPudhari
Published on: 
Updated on: 

आनंद सकपाळ

नेरळ: माथेरानच्या पर्यटनाचे प्रमुख आकर्षण आणि पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेली ‘माथेरानची राणी’ अर्थात नेरळ-माथेरान मिनी ट्रेन पुन्हा कधी धावणार, याकडे पर्यटकांसह माथेरानकरांचे लक्ष लागले आहे.

पावसाळ्यानंतर रेल्वेमार्गावरील दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्याने आणि मार्गावरील अडथळे दूर करण्यात आल्याने मिनी ट्रेनची सेवा १५ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबरदरम्यान ही सेवा पुन्हा सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Matheran Toy Train
Crime News: पत्नीबाबतचा संशय ठरला वादाचे कारण; कल्याण-शिळ महामार्गावर मुलाकडून पित्याची हत्या

यंदाच्या पावसाळ्यात नेरळ-माथेरान रेल्वेमार्गावर अनेक ठिकाणी भूस्खलनाचा धोका निर्माण झाला होता. त्यातच २२ सप्टेंबर रोजी कड्याच्या गणपतीकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गावर मोठी दरड कोसळली होती. या घटनेमुळे रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात माती, दगड आणि चिखलाचा मलबा साचल्याने रेल्वे वाहतुकीसमोर अडथळा निर्माण झाला होता.

रेल्वे प्रशासनाने तातडीने मलबा हटविण्याचे काम हाती घेतले. युद्धपातळीवर करण्यात आलेल्या कामानंतर दरडीमुळे रुळांवर साचलेला मलबा पूर्णपणे हटविण्यात आला असून संबंधित मार्गावरील आवश्यक दुरुस्तीची कामेही पूर्ण करण्यात आली आहेत.

त्यामुळे मिनी ट्रेन पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे. दरड हटविण्याचे काम पूर्ण झाल्याने आणि रेल्वेमार्गाची दुरुस्ती झाल्याने आता ‘माथेरानची राणी’ पुन्हा रुळांवर कधी धावणार, याची उत्सुकता लागली आहे.

Matheran Toy Train
Mumbai SRA Projects Audit: मुंबईतील रखडलेल्या SRA प्रकल्पांचे ऑडिट होणार; राहुल शेवाळे यांचा समितीत समावेश

रेल्वे प्रशासनाच्या अंतिम तांत्रिक पाहणीनंतर सेवेला हिरवा कंदील मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ट्रेनच्या सुरक्षित धावण्याच्या दृष्टीने तपासणी

दरवर्षी मान्सूनच्या काळात प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मध्य रेल्वेकडून १५ जून ते १५ ऑक्टोबर या कालावधीत नेरळ ते माथेरान दरम्यानची मुख्य मिनी ट्रेन सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात येते.

या काळात अमन लॉज ते माथेरान दरम्यान शटल सेवा सुरू ठेवण्यात आली होती. आता पावसाळ्याचा जोर ओसरला असून हवामानही तुलनेने अनुकूल झाले आहे. त्यामुळे संपूर्ण नेरळ-माथेरान मार्गावर मिनी ट्रेन सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून मार्गाची तांत्रिक पाहणी केली जात आहे. रेल्वे ट्रॅकची स्थिती, पावसामुळे झालेली हानी तसेच मिनी ट्रेनच्या सुरक्षित धावण्याच्या दृष्टीने आवश्यक बाबींची तपासणी करण्यात येत आहे.

ऐतिहासिक रेल्वे पर्यटकांसाठी प्रवासाचे साधन

माथेरानच्या पर्यटन व्यवसायासाठी मिनी ट्रेनला विशेष महत्त्व आहे. नेरळपासून माथेरानच्या डोंगररांगांमधून वळणावळणाने धावणारी ही ऐतिहासिक रेल्वे पर्यटकांसाठी प्रवासाचे साधन असण्याबरोबरच पर्यटनाचा स्वतंत्र अनुभव मानली जाते. त्यामुळे मिनी ट्रेनची नियमित सेवा पुन्हा सुरू झाल्यास पर्यटन हंगामाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news