

माथेरान : मिलिंद कदम
माथेरानमध्ये काही दिवसांपासून पावसाने उघडी घेतली होती परंतु या काळात नेरळ-माथेरान घाट रस्ता खड्डेमय झाल्यामुळे यातून प्रवास करताना पर्यटकांना कसरत करावी लागत असून दुचाकी वाहनस्वार तर या खड्ड्यांमध्ये अनेक वेळा पडल्याने अपघात ही झाले आहेत, त्यामुळे या घाट रस्त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी अशी मागणी स्थानिक टॅक्सी संघटना व माथेरानकर करीत आहेत.
माथेरानमध्ये येण्याकरिता नेरळ मार्गे एकमेव घाट रस्ता उपलब्ध आहे. या पावसाळ्यामध्ये जून व ऑगस्ट या दरम्यान रेकॉर्ड ब्रेक पर्यटकांनी माथेरानला भेट दिली. त्यातच जुलै चा शेवटचा आठवडा व ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस असल्याने त्याचा फटका या घाट रस्त्याला बसला आहे. या घाटातील महत्त्वाच्या वळणांवर नेमके रस्त्यांना चर गेले असून तीव्र चढावाच्या या वळणांवर गाडी चालवताना नवीन वाहन चालकाची तारांबळ होत आहे तर स्थानिक लोकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.
या रस्त्यांमुळे गाड्यांची दुरावस्था होत असून दुचाकी वाहनांना तर रस्त्या वर पडलेल्या खडी रेतीतून मार्ग काढताना अनेक वेळा अपघातास सामोरे जावे लागत आहे. येथील जुम्मापटी येथून सुरू होणारा पहिलाच मोठा एस टर्न अपघाताकरिता सर्वात जास्त ओळखला जात असून या ठिकाणी यावर्षी किमान आठ ते दहा नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. तर अनेक लोकांचे अपघात या ठिकाणी झाले आहे व आता या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध मोठ मोठाले खड्डे झाल्याने पुन्हा एकदा अपघाताची मालिका सुरू होणार का असा प्रश्न वाहन चालकांना सतावत आहे.
हीच परिस्थिती माथेरानमध्ये घाटातील अनेक अपघाती प्रवण वळणांवर झाली आहेत. या मार्गांवर असणाऱ्या रेल्वे क्रॉसिंग येथेही मोठ मोठाले खड्डेमय रस्ते झाले असून अनेक वेळा या ठिकाणी गाड्या आपटण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. खड्ड्यांमुळे वाहतूककोंडीस ही सामोरे जावे लागत आहे. आगामी काळात येथे पर्यटकांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे माथेरानचे रस्ते सुरक्षित करावेत अशी मागणी केली जाते आहे.
नेरळ-माथेरान घाट रस्ता दुरुस्तीकरिता ठेका दिला गेला असल्याची माहिती मिळत असून अजूनपर्यंत या कामांना सुरुवात झाली नसल्याने वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पावसाळ्यामध्ये हा रस्ता व्यवस्थित झाल्यास त्याला मजबुती मिळणार होती परंतु ठेकेदार या कामाकडे का दुर्लक्ष करीत असल्याने नेरळ-माथेरान टॅक्सी सेवाभावी संघटनेने हा रस्ता तातडीने दुरुस्त व्हावा याकरिता लेखी निवेदनही दिले आहे.