

मुंबई : मुंबई आणि कोकणदरम्यानची रेल्वे सेवा आणखी मजबूत करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सावंतवाडी रोड या नव्या दैनंदिन एक्स्प्रेसला बुधवारी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखविला. तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर उपस्थित होते.
सुमारे ५१० किलोमीटर अंतराच्या या नव्या रेल्वे सेवेमुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले, गणेशोत्सवासाठी यंदा ३५० विशेष गाड्या चालविण्यात येत असून गरज भासल्यास ही संख्या ३७० पर्यंत वाढविण्याची तयारी करण्यात आली आहे.
पर्यटन आणि रोजगाराला चालना
पीयूष गोयल यांनी ही सेवा केवळ नवी रेल्वे नसून कोकणच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. सुधारित रेल्वे जोडणीमुळे पर्यटन, स्थानिक व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी वाढण्यास मदत होईल. तसेच विद्यार्थी, नोकरदार आणि मुंबईत काम करणाऱ्या कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुलभ होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणाची भौगोलिक परिस्थिती अत्यंत कठीण असतानाही कोकण रेल्वेच्या ७०१.७ किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण विक्रमी वेळेत पूर्ण केल्याबद्दल त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे कौतुक केले. तसेच अनेक वर्षांपासून रेल्वेच्या जागेवर वास्तव्यास करणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वेने लवकर सोडवावा,अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मत्स्यविकास मंत्री नीलेश राणे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर राजीव श्रीवास्तव आणि इतर सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
मुंबईत पुढील वर्षापासून एसी लोकल
मुंबई उपनगरीय रेल्वेची क्षमता वाढविण्यासाठी सुमारे १८ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. मुंबईसाठी २३८ नव्या वातानुकूलित लोकल रेक मंजूर करण्यात आल्या असून, पहिल्या एसी लोकलची डिलिव्हरी २०२७ पासून सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.
गाडी क्रमांक १५०८७ ही एक्स्प्रेस दररोज रात्री ११.५५ वाजता सीएसएमटीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २.१५ वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.
परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक १५०८८ सायंकाळी ५.२० वाजता सावंतवाडी रोडहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४० वाजता मुंबईत पोहोचेल.
गाडीचे थांबे :
दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.
गणेशोत्सवाला अवघे दहा दिवस बाकी असताना ही रेल्वे सुरू झाल्याने कोकण वासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबद्दल कोकणवासियांनी रेल्वेचे आभार मानले आहेत.