

खोपोली ः प्रशांत गोपाळे
रायगड जिल्हयातील दहा नगरपालिकांच्या निवडणुकीचे मतदान 2 डिसेंबरला पार पडले. या निवडणुकीची मतमोजणी 3 डिसेंबर होणार होती. तशी तयारीही उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र अचानक नागपूर खंडपीठाने राज्यातील इतर थांबलेल्या निवडणुका घेऊनच एकाहाती निकाल जाहीर करण्यासंदर्भात सर्वच नगरपालिकांची मतमोजणी पुढे ढकलली आहे. यामुळे निकालासाठी 15 दिवस वाट पाहावी लागणार असल्याने आता प्रत्येक उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रभागात कुठे साथ तर कुठे दगा मिळण्याची शक्यता आहे, याबाबत आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. झालेल्या मतदानाची आकडेमोड सुरू झाली असून उमेदवारांची धाकधुक चांगलीच वाढत चालली आहे.
रायगड जिल्हयातील अलिबाग, मुरुड-जंजिरा, रोहा, श्रीवर्धन, महाड, पेण, उरण, कर्जत, माथेरान, खोपोली या दहा नगरपालिकांच्या निवडणुकीचे मतदान 2 डिसेंबर रोजी झाले. जिल्हयात 70.26 टक्के मतदान झाले आहे. जिल्ह्यात एकूण 2 लाख 37 हजार 503 मतदारांपैकी 1 लाख 66 हजार 858 मतदारांनी मतदान केले आहे. या निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे उमेदवारांचे टेन्शन वाढीस लागले आहे.
रायगडात नगराध्यक्ष पदासाठी अलिबागमध्ये शेकाप-काँग्रेस-मनसे आघाडी विरुद्ध भाजप-शिवसेना शिंदे गट, रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना शिंदे गट, माथेरानमध्ये महायुती विरुद्ध शिवराष्ट्र पॅनल, कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट-शिवसेना उबाठा महापरिवर्तन आघाडी विरुद्ध भाजप-शिवसेना शिंदे गट युती, पेणमध्ये भाजप- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध पेणकर आघाडी, मुरुडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) विरुद्ध शिवसेना शिंदे गट विरुद्ध शेकाप, श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना उठाबा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, उरणमध्ये भाजप विरुद्ध आघाडी विरुद्ध शिवसेना शिंदे गट विरुद्ध अपक्ष, महाडमध्ये शिवसेना उबाठा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट विरुद्ध अपक्ष अशा चुरशीच्या लढती झाल्या आहेत. तर नगरसेवक पदांसाठीही काँटेकी टक्कर ठिकठिकाणच्या प्रभागांमध्ये झाल्या आहेत.
खोपोली नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट, भाजप आणि आरपीआय पक्षाने महायुती केली होती. तर अजित पवारांची राष्ट्रवादी-ठाकरे गट-शेकापक्ष यांनी परिवर्तन विकास आघाडी केली आणि निवडणुकीला सामोरे गेले. मात्र तिकीट कापल्याने शिंदे गटात नाराजी वाढली असताना अजित पवारांची राष्ट्रवादी, ठाकरे गट, शेकाप यांच्या सुद्धा जागा वाटपाचा तिडा सुटला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी उबाठा शिवसेना व शेकाप यांनी जास्त उमेदवार उभे केल्याने मैत्रीपूर्ण लढती झाल्या. निवडणूक काळात अनेक अडचणींचा सामना परिवर्तन विकास आघाडीला करावा लागला मात्र असे असतानाही दोन्हीकडून या अडचणींवर मात करून निवडणुकीला सामोरे गेले मात्र या निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबर ला होणारा 21 डिसेंबर जाहीर होणार असल्याने उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे.
अनेकांनी विजयाची तयारी ही केली होती त्यामुळे या निर्णयाबद्दल अनेकांनी नाराजी ही व्यक्त केली मात्र आता या 15 दिवसात उमेदवारीची आकडेवारी मोजण्याला सुरुवात झाली असून कुठून पाठींबा मिळाला तर कुठे आपल्याला दगाफटका झाला, या बाबत आत्मपरीक्षण सुरू झाले असून अनेक भागात काय परिस्थिती होती याची विचारणा करताना कार्यकर्ते व उमेदवार दिसत आहेत.
मतदानाची अंतिम आकडेवारी हाती येताच उमेदवार आणि कार्यकर्त्यांकडून आढावा घेतला जात आहे. मागील नगरपालिका निवडणुकीतील मतदान आणि यावेळी झालेले मतदान याचे विश्लेषण केले जाते आहे. मागील निवडणुकीत झालेल्या चुका टाळून ही निवडणूक लढविली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाकडे गेलेली मते यावेळी आपल्याला मिळणार असल्याने आपला विजय निश्चित असल्याचा दावा केला जात आहे. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या, तर काही ठिकाणी निवडणूक ही एकतर्फी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येथील कार्यकर्त्यांनी आताच विजयोत्सवाची तयारी सुरु केलेली दिसून येते आहे.
खोपोली नगरपालिका निवडणूक ही केवळ उमेदवारांसाठी महत्वाचाही नव्हती तर या खोपोली शहरातून विधानसभेला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांना काहीसा दुर्लक्ष झाल्याने निसटता पराभव पत्करावा लागला होता तर आमदार थोरवे यांना खोपोली शहरातील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी धडपड सुरू होती, त्यामुळे खोपोली नगरपालिकेची निवडणूक या नेतेगणांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आता प्रतीक्षा 21 डिसेंबरची असून कोण सिद्ध करणार वर्चस्व याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहेत.
नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीमुळे नगरपालिका निवडणुका चुरशीच्या होत आहेत. नगराध्यक्ष पदाची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली जात आहे. काही करून नगरपालिकांवर आपला नगराध्यक्ष बसवायचा असा निर्धार करून सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक लढविली असल्याने प्रत्येकाकडून विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत.