

खोपोली ः प्रशांत गोपाळे
मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे- लोणावळा या पर्यटनस्थळी नाताळ सण साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. यामुळे महामार्गावर वाहनांची गर्दी वाढल्याने वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे सण साजरा करण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अनेकांनी जुन्या महामार्गावर वाट काढण्याचा प्रयत्न केला.मात्र, घाटाची चढणी चढताना या मार्गावर वाहन बंद पडत असल्याने तोही प्रयत्न फसला असल्याने पुण्याकडे जाणारे दोन्ही मार्ग सकाळपासून जाम झाले होते.
मुंबई - पुणे द्रुतगती महामार्ग झटपट प्रवासाचा मार्ग म्हणून ओळख आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे वाहनचालक पसंत करीत असतात. गुरुवारी नाताळ सणानिमित्त सुट्टीमुळे वाहनांची संख्या वाढल्याने मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे बाजूकडील लेनवर वाहतूक कोंडी झाली. महामार्गावर वाहनांच्या मोठ्या प्रमाणात लांब लचक रांगा लागल्या होत्या.
त्यामुळे पर्यटकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी वेळा चुकल्या मात्र काही वाहनांनी जुन्या महामार्गावरून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला असता या मार्गावर ही वाहनांच्या रांगा लागल्याने मुंबईतील पर्यटकांना वाहतूक कोंडीचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे नाताळ सणात वाहतूक कोंडी चे विघ्न आल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे.याचा त्रास स्थानिक वाहतुकीवरही झाल्याने शहरवासियही हैराण झाल्याचे जाणवले.
बोरघाटात अनेक वाहने तापली
एक्स्प्रेस वे वरुन पुण्याबाजूकडे जाताना बोरघाट असल्याने चढणीवर अनेक वाहने गरम होऊन गाड्यांमध्ये बिघाड झाला. गाडी थंड होईपर्यत तासंतास एकाच जागेवर गाड्या थांबल्या होत्या तर काही गाड्यांना गाडी दुरुस्तीसाठी फिटरचा ही आधार घ्यावा लागला. यावेळेस अनेक ठिकणी वाहने दुरुस्ती करताना चित्र होते . त्यामुळे नाताळची अर्धी सुट्टी प्रवासातच संपल्याची प्रतिक्रिया अनेक पर्यटकांनी दिली आहे.
कोंडी सोडविताना पोलिसांची दमछाक
द्रुतगती महामार्गावर नाताळ सणानिमित्त वाहनांची गर्दी वाढल्याने खालापूर टोलनाका येथे टोल फाडण्यासाठी रांगा लागल्या होत्या. खंडाळा घाट चढताना जवळपाच चढणीवर तीन ते चार किलो मोटर च्या रांगा लागल्या होत्या. चढणीवर अनयकांची वाहने बंद पडल्याने ही वाहने बाजूला करताना मोठा वेळ लागत असल्याने वाहतूक कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांनी दमछाक होत होती. जुन्या महामार्गावर ही घाट चढताना वाहतूक कोंडी मुले बंद पडण्याच्या घटना घडल्याने या मार्गावर ही वाहतूक कोंडी चा फटका पर्यटकांना बसला आहे.