

खोपली शहर : दिलीप पवार
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टँकर गळतीने तब्बल 34 तास बोरघाट ठप्प होता. अवघड बोरघाट व नेहमीच वाहतूककोंडी आता कायम स्वरुपी मिटणार आहे. बोरघाटातील खोपोली बायपास ते लोणावळा सिंहगड कॉलेज अशा 8 किमी अंतराच्या सह्याद्रीच्या पोटातून जाणाऱ्या मिसिंग लिंकचे काम अंतिम टप्प्यात आहे.
2026 च्या पावसाळ्यापूर्वी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याने हा मार्ग एक रस्ताच राहणार नसून महाकाय 2 बोगदे, 2 केबल स्डेड पुल तसेच चावणी खोऱ्यातील गर्द झाडी व पावसाळ्यातील धबधबे असा निसर्गाने बहरुन निघणारा मिसिंग लिंक प्रवासी तसेच पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहे. तब्बल 7 हजार 500 कोटी रुपये खर्चाचा हा मार्ग आहे. कोविड कालावधीत काही काळ ठप्प असणाऱ्या या प्रोजेक्टला चालना देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रयत्न करीत खंडाळा येथील बोगद्याचे व मार्गाच्या कामाची पाहणी जातीने प्रोजेक्ट स्थळी जात केली होती.
अनेक समस्यांना तोंड देत 3 वर्षे उशिरा तयार होणाऱ्या मिसिंग लिंकचे काम मे 2026 मधे पूर्ण होणार आहे. शिवसेना भाजप सत्तेतील कालावधीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी या मार्गाची पायभरणी केली होती.
तालुक्यातील आडोशी गावच्या हद्दीतून बोरघाटातील खोपोली बायपास मार्गापासून सुरु होणारा या आठ पदरी रस्ता पुणे मार्गिकेवर चार लेन व मुंबई मार्गिकेवर चार लेन आहेत. चावणी गावाच्या हद्दीतून जमिनीच्या पोटातून 150 मीटर खालून खंडाळा व लोणावळा असा थेट सिंहगड महाविद्यालयाच्या जवळ निघणार आहे. या मार्गाने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अंतर जवळपास 8 किमीने कमी होणार असून 25 मिनिटांची प्रवासात बचत होणार आहे. मुंबई- पुण्याचे अंतर कमी होत, जलदगतीने या दोन्ही शहरातील प्रवास होणार आहे.
मिसिंग लिंक मार्गावर चावणी गावच्या हद्दीत होणाऱ्या केबल पुलाचे अंतर 645 मीटर लांब व उंची तब्बल 135 मीटर आहे. तर दुसरा पूल 770 मीटर लांब व 30 मीटर उंच असणार आहे. त्यापुढे जमिनीच्या 150 मीटर खालून जवळपास 2 किमी अंतराचे 2 समांतर बोगदे असून येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांसाठी असणाऱ्या या बोगद्याला दर 500 मीटर अंतरावर जोडले जातील.